मराठा आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये

नारायण राणे : मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणण्यात पुढाकार घेणार
मुंबई – मी मराठा समाजाचा आहे. मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे अशी आपली भूमिका आहे. मात्र, मराठा आरक्षणावरून राज्यात निर्माण झालेली परिस्थिती पाहता आंदोलकांनी आंदोलन थांबवावे, तुटेपर्यंत ताणू नका. मुख्यमंत्री चर्चा करण्यासाठी तयार आहेत. आंदोलकांतील प्रमुख व्यक्‍ती आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा घडवून आणण्यास पुढाकार घेईन, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवरून मराठा क्रांती मोर्चाने राज्यात बंदची हाक दिली होती. त्यापार्श्वभूमिवर मराठा समाजातील आंदोलक नेत्यांनी शुक्रवारी नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. राणे समितीच्या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करावी, आंदोलकांवरील केसेस तातडीने मागे घ्याव्यात व आरक्षण तात्काळ लागू करावे अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.आंदोलकांच्या मागण्या आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पोहोचविण्याचा निश्‍चित प्रयत्न करू, असे आश्वासन राणे यांनी आंदोलकांना दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरक्षणासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सध्या सुरू असलेले आंदोलन थांबावे, आपण आरक्षणासंदर्भात चर्चा करायला तयारच असल्याचे मुख्यमंत्री म्हणाल्याचे राणे यांनी सांगितले.

आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण समितीचे नारायण राणे अध्यक्ष होते. आपण सादर केलेल्या अहवालाची अंमलबजावणी झाली. विद्यार्थ्यांना त्यानुसार प्रवेशही मिळाले, काही जणांना नोकऱ्याही मिळाल्या. सरकार बदलल्यानंतर सरकारकडूनच काही गोष्टी आल्या. आपण हा अहवाल कायदेतज्ञांकडून सर्व बाबी तपासूनच बनविला होता. घटनेनुसारच त्यात आरक्षण देण्यात आले होते. मराठयांना आरक्षण कसे मिळेल हे सर्व त्या अहवालात असल्याचेही राणे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण पुन्हा भेट घेउन आंदोलकांची भूमिका त्यांना सांगणार आहे.येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि आंदोलकांतील प्रमुख व्यक्‍ती यांची भेट घडवून देण्याचाही प्रयत्न करू असेही नारायण राणे म्हणाले.आमदारांच्या राजीनामा सत्राबद्‌दल आपल्याला काहीही बोलायचे नाही.तसेच आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाची आवश्‍यकता आहे असे वाटत नसल्याचेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नारायण राणे यांनी यावेळी त्यांना शुभेच्छाही दिल्या.शिवसेनेने सध्या चलो अयोध्या,चलो वाराणसी अशी हाक दिली आहे. त्याबाबत विचारले असता अयोध्येच्या पुढे हिमालय आहे.अंगावर फक्‍त आता भगवे कपडे घालायचेच बाकी असल्याचा टोला त्यांनी यावर लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)