मराठवाडा पतसंस्थेचा एचआयव्हीग्रस्त मुलांना मदतीचा हात

पिंपरी – त्रिदशक महोत्सव साजरा करीत असलेल्या मराठवाडा नागरीक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दुर्लक्षित असलेल्या एचआयव्हीग्रस्त मुलांना एक लाख एक हजार रुपयाची मदत करण्यात आली. तसेच एचआयव्ही ग्रस्त मुलांसाठी “”हॅप्पी म्युझिक शो” चे आयोजनही करण्यात आले होते.

मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्थेच्या त्रिदशक मोहत्सवानिमित्त सांगवी येथील नटसम्राट निळु फुले रंगमंदिर येथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महापौर राहुल जाधव, प्रेरणाताई पाटील (निलंगेकर), सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, शशिकांत कदम, मराठवाड जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, आम्ही सेवक या संस्थेचे प्रमुख प्रा. रवि बापटले, संस्थेचे अध्यक्ष द्‌यानंद जेवळे, कार्यकारी संचालक दत्तात्रय धोंगडे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलावामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष दयानंद जेवळे यांनी “आम्ही सेवक’ या संस्थेच्या आश्रमासाठी मदत म्हणून 1 लाख 1 हजार रुपयाचा धनादेश दिला. यावेळी महापौर राहुल जाधव यांनी पतसंस्थेने सामाजिक बांधिलकीमधून एचआयव्ही ग्रस्तांना केलेल्या मदतीचे कौतुक केले. कार्यक्रमाची प्रस्तावना दयानंद जेवळे यांनी केली, तर आभार पतसंस्थेचे उपाध्यक्ष संजीवन माने यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे सभासद, कर्मचारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.