पुणे – येथील विराग क्रिकेट ऍकॅडमीच्या मैदानात सुरू असलेल्या, 19 वर्षांखालील मुलांसाठीची मनोहर करंडक क्रिकेट स्पर्धेच्या गटसाखळी फेरीतील चौथ्या सामन्यात, डेक्कन जिमखानाच्या संघाने देवधर ट्रस्टच्या संघाचा 68 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना डेक्कन जिमखानाच्या संघाने 19.4 षटकात सर्वबाद 145 धावा करत देवधर ट्रस्टच्या संघासमोर 146 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना देवधरचा संघ 16.5 षटकात सर्वबाद 77 धावाच करू शकल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
सामन्यात देवधर ट्रस्टकडून सलामीवीर विशाल हिप्परकर याने सर्वाधीक 16 धावा केल्या तर अभिजीत भगतने 12 धावा करत त्याला साथ दिली. तर तळातील फलंदाज अभिषेक शिंदेने 16 धावा करत संघर्षाचा अपयशी प्रयत्न केला. यावेळी डेक्कनच्या आर्यन बांगलेने 21 धावा देत 4 गडी बाद केले तर आकाश यादवने 16 धावात 3 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली. तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना डेक्कनच्या संघाने अथर्व चिप्पा आणि आत्मन पोरे यांच्या फलंदाजीच्या जोरावर 19.4 षटकात सर्वबाद 145 धावांपर्यंत मजल मारली. यावेळी अथर्वने 27 धावा केल्या. तर आत्मनने 31 धावा केल्या. हेदोघेही बाद झाल्या नंतर तळातील फलंदाज आकाश यादवने 25 धावा करत संघाला 145 धावांपर्यंत मजल मारुन दिली. सामन्यात देवधर संघाच्या गोलंदाजांनी 26 अतिरिक्त धावा दिल्या. यावेळी देवधरकडून प्रथमेश बोलभाटने 20 धावात 3 गडी मिळवले, तर अभिषेक शिंदे, अंकुर भोतगिरे आणि ओमकार गाढगे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा