मनातला श्रावण

पाऊलवाटेच्या काठावर उभी असलेली सोनपिवळी गवतफुलं आपलं लक्ष वेधून घेतात. निसर्गाची ती इवलीशी अदाकारी पाहून आपणही हरखून जातो. हिरव्या रंगाच्या पार्श्‍वभूमीवर तर ती नक्षी अधिकच खुलून दिसते. पाऊसधारा अंगावर झेलणारी, मध्येच सूर्यदर्शन झालं की, तिकडे टकामका बघणारी, वाऱ्याच्या झुळुकांसोबत डोलणारी ही गवतफुलं मनाला हळूवार स्पर्श करून जातात. तसंच त्या नवजात तृणपात्यांचं. जमिनीवर आधी पोपटी, हिरवे रांगोळीचे ठिपके दिसू लागतात अन्‌ मग गालिच्यामध्ये रंग भरावेत तसे विविध छटांचे हिरवे रंग जमिनीला आच्छादून टाकतात.

आपल्या नजरेला दिसणारे रंग खरेच तसेच आहेत का? त्या रंगरेषांमधले कितीतरी बिंदू आपल्याकडून दुर्लक्षितच राहतात आणि त्यांचा प्रवासही. त्या पिवळ्या हिरव्या रंगामध्ये किती काय काय सामावलेलं असतं. त्यांचं जमिनीत रुजून वर येणं, कणाकणांनी वाढत जाणं, कळीचं गर्भारपण मिरवणं, तिचा जन्म, तिचं फूल होणं ह्या सगळ्या आयुष्याचे धागे आणि रंग उतरलेले असतात त्या फुलांमध्ये, तृणपात्यांमध्ये. त्यांच्या गाभ्याशी असलेले रंग आपण पाहातच नाही. त्याचा गंध आपल्याला जाणवतच नाही. नाजुकसा पिवळा पोपटी रंग लेवून जन्माला आलेला तो फुलदांडा जेव्हा फुलाला अंगाखांद्यावर घेऊन वागवायची वेळ येते तेव्हा कसा हिरवट, तापकिरी, रुबाबदार झालेला असतो. त्यांच्याही मनाचे रंग असतील, त्यांचीही मनभाषा असेलच ना? भवतालच्या सुखदु:खांच्या लहरींचे परिणाम त्यांच्यावरही होत असतील ना? पण त्यातूनही उभं राहण्याची अगम्य विजिगीषा आणि तिचाही एक वेगळा रंग असेलच की!

अर्थातच हे कधी दिसेल तर आपण मान झुकवून खाली पाहिलं तर! स्वत्व विसरून सृष्टीच्या ह्या छोट्याश्‍या अंशाबद्दल आपल्याला जिव्हाळा, आत्मियता, प्रेम वाटलं तर! नाहीतर किती सहज खुडून टाकतो आपण ही आयुष्यं अन्‌ त्यांचे प्रवास. हे झालं आपल्या दृष्टीने इवल्याशा, नगण्य असणाऱ्या तृणपात्यांबाबत! पण ह्या सगळ्याची महती आपल्या खिजगणतीतही नसेल तर झाडाझुडपांच्या, मोठमोठ्या वृक्षांच्या निष्काम कर्मयोग्यासारखा प्रवासाबाबत आपण असेच अस्पर्श राहणार, अनभिज्ञ राहणार. आपण स्वत:ला निसर्गाचा अंश मानलं तरच तो सहानुभाव, सहवेदना आपल्या हृदयापर्यंत पोहोचेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ,’ ही म्हण आता आपण समजून, उमजून घेण्याची वेळ आली आहे. झाडाच्या लाकडापासून बनलेला कुऱ्हाडीचा दांडा त्याच्याच गणगोताच्या विनाशाला कारणीभूत होतो. पण ते चालवणारे हात तर माणसाचेच आहे ना? झाडांना आपण खरंच सगेसोयरे मानतो का? उद्या त्यांची रुजलेली मुळं, त्यांना कवेत घेणारी ही धरा आपल्याला ह्या सगळ्यांचा नक्‍की जाब विचारतील. शेवटी राख होऊन मातीतच मिसळायचं आहे, हे भान आलं तर मग सगळीकडे अगणित हिरवे, पिवळे, लाल, जांभळे रंग उमलून फुलून येतील अन्‌ आपलं आयुष्य इंद्रधनुषी बनेल. गवताच्या पात्यांवरील पाऊस थेंबाप्रमाणे मन निरामय होऊन स्फटिकासारखं चमकेल. छोटीशी पाऊलवाट सजगतेचा दिगंतापार नेणारा राजरस्ता बनून जाईल.

– हर्षल राजशिर्के

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)