मनमानी पार्किंगमुळे शिरूर बकाल

शहरातील प्रमुख, वर्दळीच्या मार्गावर मनमानी कारभार : इमारतीमध्ये पार्किंगला तिलांजली

शिरूर- शिरूर शहरात तालुक्‍यात पार्किंग प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मुख्य रस्त्यालगतची व शिरूर शहर येथे ही पार्किंग समस्या डोकेदुखी ठरली आहे. यासाठी नक्‍की पर्याय काढणार का, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. मनमानी पार्किंगमुळे शिरूर शहर बकाल होत आहे.

शिरूर तालुका हा लोकसंख्या व औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. दररोज रोजगारासाठी नागरिक येतात. आता प्रत्येक घराबरोबर एक किंवा दोन मोटरसायकल दिसत आहेत. त्यात चारचाकी गाड्यांची संख्या वाढली आहे. 40 टक्‍के नागरिकांनी आपल्या बांधकामात पार्किंगसाठी जागा ठेवली आहे. काही बिल्डरनी पार्किंगच गिळंकृत केली आहेत. शहर, प्रमुख महामार्गावरील ग्रामपंचायत, नगरपालिकेने पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे मोठ्या लोकवस्तीच्या गावात नागरिक महामार्गालगत मनमानी पद्धतीने वाहने पार्किंग करीत आहेत. त्यामुळे या भागात अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. नागरिक व वाहनचालकांची नेहमीमध्ये वादावादी होत आहे. त्यात नगरपालिका व ग्रामपंचायतीकडून पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. पार्किंगच्या सुविधेतून ग्रामपंचायत व नगरपालिकेला आर्थिक स्त्रोत निर्माण होईल, असा सूर नागरिकांतून उमटत आहे. सर्वांची डोकेदुखी ठरलेली पार्किंगच्या समस्यातून सुटका व्हावी, याकरिता कार्यवाही करणे गरजेची आहे.

प्रवासी वाहतूक करणारे सहा सीटर, रिक्षा, जीप आदी वाहने रस्त्याच्या मधोमध प्रवासी गोळा करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. तसेच अनेक छोटे, मोठे अपघात होत आहे. तरीही प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन व पोलिस विभागाकडून संयुक्‍त कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. अनेक नागरिकांनी नवीन घरे बांधताना बांधकाम नकाशावर पार्किंगची सुविधा दाखवली आहे. परंतु प्रत्यक्ष काम झाल्यावर पार्किंगच्या जागेवर व्यवसायिक गाळे बांधल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहने रस्त्यावर पार्क केलेली दिसत आहेत.

शिरूर शहरात इंदिरा गांधी पुतळ्याजवळच एक वाईन शॉपजवळ अनेक ग्राहक दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यातच पार्क करून खरेदी करत आहेत. त्यांच्या आडमुठेपणामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी होत आहे. परंतु याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. शिरूर एसटी स्टॅंड, नगरपालिका इमारती परिसर, गाडीतळ, पोस्ट, विद्याधाम शाळा, बागवाननगर, व्यापारी संकुल, पोलीस स्टेशन मनमानी पार्किंग करणाऱ्यांची प्रमुख ठिकाणे बनली आहेत. परंतु याकडे नगरपरिषद व पोलीस खाते दुर्लक्ष करीत आहेत.

शहरात सेंटर दवाखान्याकडे जाणारा मार्ग, माणिकचंद हॉस्पिटल मार्ग, शाळा, पोस्ट, कोर्टाकडे जाणाऱ्या मार्गावर मनमानी पार्किंग केले जात आहे. त्यामुळे शिरूर शहर बकाल शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. पार्किंगसाठी नगरपालिका व पोलीस विभागात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्‍त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.