मनपा कर्मचाऱ्यांना आता “धन्वंतरी’ऐवजी आरोग्य वीमा?

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच सेवानिवृत्तांनादेखील लागू असलेली धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करून, त्याऐवजी वैयक्‍तिक वीमा योजना लागू करण्याची चाचपणी महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. त्याकरिता वीमा योजना कंपन्यांचे प्रस्ताव पडताळून पाहिले जात असल्याची माहिती महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती बीले सादर करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, या योजनेअंतर्गत वाढीव खर्च होऊ लागल्याने, महापालिकेच्या वैद्यकीय धोणात बदल करण्यात आला. या नवीन वैद्यकीय धोरणांतर्गत 1 सप्टेंबर 2015 पासून महापालिका कर्मचाऱ्यांना धन्वंतरी स्वास्थ योजना लागू करण्यात आली आहे. महापालिका सेवेतील सुमारे साडे सात हजार कर्मचारी तसेच काही दिवसांपुर्वीच या योजनेत महापालिकका सेवेतील शिक्षकांनादेखील सामावून घेण्यात आले आहे. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी यांनादेखील ही योजना ऐच्छिक पद्धतीने लागू करण्यात आली आहे. ही संख्या दहा हजारांपेक्षा अधिक आहे.

या योजनेअंतर्गत महापालिका सेवेतील कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनातून 300 रुपयांची कपात केली जात आहे. तर सेवानिवृत्त कर्मचारी अथवा अधिकाऱ्याच्या वेतनातून दरमहा 150 रुपये कपात केली जाते. या योजनेचा लाभ कर्मचारी व त्याची पत्नी अथवा पती यांच्याबरोबरच 18 वर्षाखालील दोन पाल्यांना याचा लाभ घेता येत आहे. त्याकरिता संबंधित विभागाकडून त्या कर्मचाऱ्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. सेवानिवृत्तीनंतरही ही योजना चालू ठेवायची की नाही, याचा निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हाभरातील सुमारे 100 रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, वैद्यकीय विभागांतर्गत असलेल्या धन्वंतरी स्वास्थ योजना समितीच्या सभेत कर्माऱ्यांची बीले मंजुर अथवा नाकारण्यासाठी विषय येत असतात. त्यामध्ये वैद्यकीय उपचाराकरिता रुग्ण दाखल झाल्यानंतर पुढील 48 तासांत तशी माहिती संबंधित विभागाला देणे बंधनकारक आहे. मात्र, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या सुमारे 70 टक्के कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पात्र लाभार्थींची नावे असलेली यादी अद्यापही वैद्यकीय विभागाला उपलब्ध झालेली नाही. तोच आता आरोग्य धोरणात बदल करण्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पुन्हा कर्मचाऱ्यांसाठी वैयक्‍तिक आरोग्य वीमा योजना लागू करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी प्राथमिक बैठक झाली आहे.

धन्वंतरीची कोट्यवधींची उड्डाणे…
धन्वंतरी स्वास्थ योजनेअंतर्गत वर्षभरात सुमारे 24 ते 25 कोटींचा खर्च होत आहे. त्यामुळे दर महिन्याला महापालिकेला या योजनेसाठी दोन कोटींचे अर्थसहाय्य करावे लागत आहे. तीन-चार वर्षांपुर्वी महापालिका कर्मचाऱ्याच्या पाल्यावर थेरगावमधील खासगी रुग्णालयात वर्षभर सुरू असलेल्या उपाचारांकरिता महापालिका प्रशासनाने 25 लाखांपेक्षा अधिक रक्कम मोजली होती. त्यावरून महापालिका प्रशासनावर जोरदार टिका झाली होती. याशिवाय दरवर्षी होणाऱ्या कोट्यवधीचा खर्च आवाक्‍यात आणण्यासाठी वैयक्‍तिक आरोग्य वीमा योजना लागू करण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

प्रस्तावित वैयक्‍तिक आरोग्य वीमा योजनेअंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याला तीन लाख खर्चाची मर्यादा असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, एखाद्या कर्मचाऱ्याच्या उपचारांकरिता यापेक्षा अधिक खर्च आल्यास, अशा परिस्थितीत हा कर्मचारी पुढील उपचारांचा खर्च कसा करणार असा प्रश्‍न उपस्थित केला. ही समस्या सोडविण्यासाठी वीमा योजना मर्यादेनंतर होणाऱ्या खर्चासाठी महापालिकेने वैद्यकीय धोरणांतर्गत वर्षभरासाठी 10 कोटींची अधिक तरतूद करण्याचे प्रशासनाला सुचविले आहे. मात्र, सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करूनच यावर अंतिम निर्णय गेतला जाणार आहे.
– बबन झिंजुर्डे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)