मध्यस्थीच्या वादातून पोकळेंच्या गाडीवर दगडफेक

शिरूर – कवठे येमाई (ता. शिरूर) येथे जमिनीच्या वादात मध्यस्थी करतो म्हणून तरुणाने पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांच्या कारच्या काचा फोडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 5) दुपारी एकच्या सुमारास घडली.

आनंदा भरत वर्पे (रा. कवठे येमाई, ता. शिरूर), असे आरोपीचे नाव आहे. याबाबत डॉ. सुभाष पोकळे (रा. कवठे येमाई) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आनंदा वर्पे व त्याची चुलत बहीण हेमलता जठार यांचे जमिनीचे कारणावरून वाद होता. त्यांचे वाद मिटवण्यासाठी पोकळे यांना बोलविले होते. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी त्यांचे पाहुण्यांसह जमिनीचा वाद मिटवण्यासाठी गेले होते. त्यांचा जमिनीचा वाद तोंडी मिटवण्याचा प्रयत्न केला होता.

तेव्हापासून वर्पे हा पोकळे यांच्याकडे रागाने पहात होता. याच रागातून दि. 1 जुलै रोजी दुपारी पोकळे यांची कार कवठे येमाई येथील घरातून गावात पशुवैद्यकीय दवाखान्यात समोर आली असता आनंदा वर्पे हा आमच्या जमिनीच्या वादामध्ये मध्यस्थी करतो का, तुला आता खल्लासच करतो, अशी धमकी देत पोकळे यांच्या कारवर दगड फेकून मारले. त्यावेळी पोकळे हे कारच्या बाजूची काच वर घेताना वरपे याने पुन्हा दगड मारले. त्यानंतर पोकळे हे कारमध्ये लपून बसले. त्यानंतर पुन्हा कारच्या मागील बाजूवर दगड मारले. हा प्रकार सुरू असताना उत्तम जाधव व पांडुरंग कारभारी यांनी वरपे यास पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही ढकलून पुन्हा माझ्या अंगावर धावून आला. यावेळेस पोकळे यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमा झाले. त्यानंतर आरोपी वर्पे हा घटनास्थळावर पसार झाला. त्यानंतर पोकळे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस हवालदार कोकरे करीत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.