मद्यपींच्या त्रासाने नागरिक त्रस्त ;अशोका आगम सोसायटीतील नागरिकांना मनस्ताप

मद्यपींच्या त्रासाने नागरिक त्रस्त
अशोका आगम सोसायटीतील नागरिकांना नाहक मनस्ताप
– परिसरातील वाईन, बिअर शॉपीबाहेर बसतात पित
…………..
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 13 – अशोका आगम सोसायटी (कात्रज-देहूरोड बायपास)मध्ये वाईन आणि बिअर शॉपी सुरू आहे. या वाईन व बिअर शॉपीतून मद्य घेऊन ग्राहक दुकानाबाहेरच पित बसतात. तर तेथील स्नॅक सेंटर व चायनीज सेंटरनेसुद्धा मद्यपींना बसण्याची सोय केली आहे. यामुळे सोसायटीतील गाळेधारकांचा आवार मद्यपींचा अड्डा बनला आहे. या मद्यपींचा त्रास सोसायटीतील महिला व लहान मुलांना होत आहे. मद्यपींकडून नशेत शिवीगाळ, अश्‍लिल चाळे करणे असे प्रकार घडत आहेत. सोसायटीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रार दिली आहे. मात्र, पोलीस ठाण्याकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. यामुळे सोसायटीतील सदस्यांनी नुकतीच पोलीस आयुक्‍तांची भेट घेतली. पोलीस आयुक्‍तांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे.
भारती विद्यापीठ-दत्तनगर रस्त्यावर महामार्गांलगतच अशोका आगम सोसायटी आहे. सोसाटीच्या पुढच्या बाजूला गाळे आहेत. यातील काही गाळ्यांमध्ये स्नॅक सेंटर, चायनीज सेंटर व इतर व्यवसाय आहेत; तर दोन गाळ्यांमध्ये वाईन शॉपी आणि बिअर शॉपी आहे. सोसायटीतील सदस्यांना वाईन शॉपी व बिअर शॉपीची अडचण नव्हती. मात्र, या गाळेधारकांनी ग्राहकांना मद्य विकल्यावर गाळ्याच्या बाहेरच बसून सेवन करण्याची बेकायदा परवानी दिली आहे. तसेच, शेजारील चायनीज आणि स्नॅक सेंटरनेही मद्यपींना बसण्याची सोय केली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने सोसायटीतील सदस्यांनी वाईन शॉपी आणि बिअर शॉपीवर आक्षेप घेतला आहे. येथे सकाळी 10 वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत मद्यपींचा राबता असतो. मद्य घेऊन दुकानांच्या पायऱ्यांवर, सोसायटीच्या बाहेरच्या आवारात तसेच तेथील स्नॅक सेंटरमध्ये मद्याचे सेवन केले जाते. यामुळे एका वेळेस 20 ते 40 मद्यपींचा अड्डाच तेथे बनलेला असतो. हे मद्यपी नशेमध्ये जोरजोरात शिवीगाळ करणे, अर्वाच्य भाषा वापरणे, सोसायटीच्या आवारातच लघवी करणे असे प्रकार करतात. यामुळे सायंकाळच्या वेळी महिला व मुलांना सोसायटीतून बाहेर जाताना व आत प्रवेश करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
……………..
                          सोसायटी सदस्य रस्ता रोकोच्या तयारीत
अशोका आगम सोसायटीच्या सदस्यांनी हा प्रश्‍न घेऊन मागील अनेक वर्षे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारल्या आहेत. मात्र, वाईन शॉप व बिअर शॉपीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. वाईन व बिअर शॉप चालकांस पाठिशी घातले जात असल्याने सोसायटीतील सदस्य त्रस्त आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही सोसायटीतील सदस्यांनी धाव घेतली. मात्र, तेथेही कोणतीच दखल घेतली गेली नाही. यामुळे सोसायटीचे सदस्य रस्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.