मतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा

बंदोबस्ताची सूत्रे एसपींकडे; चार हजाराची फौज तैनात
सातारा, दि. 23 (प्रतिनिधी) –

सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या, दि. 24 रोजी होत असून त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलातील साडेतीन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय व राज्य राखीव पोलीस दल, निमलष्करी पोलीस दल, गृहरक्षक दलाचे अधिकारी, कर्मचारी असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतमोजणी प्रक्रिया शांततेत होण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी कंबर कसली आहे.

पोलीस दलाने संवेदनशील, अतिसंवेदनशील गावांची यादी करून तेथे शांतता राखण्यासाठी मतमोजणी प्रक्रियेदरम्यान व निकालानंतर मास्टर प्लॅन आखला आहे. बंदोबस्ताची सर्व सूत्रे तेजस्वी सातपुते यांच्याकडे आहेत. बंदोबस्त प्रभारी म्हणून धीरज पाटील काम पाहणार आहेत.

माण, फलटण वगळता इतर विधानसभा व लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन उपविभागीय पोलीस अधिकारी, सात पोलीस निरीक्षक, 34 सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, 396 कर्मचारी, निमलष्करी दलाची एक कंपनी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, होमगार्ड, तीन दंगा नियंत्रण पथके असा बंदोबस्त असेल.

माण मतदारसंघाची मतमोजणी होत असलेल्या दहिवडी येथे एक उपविभागीय पोलीस अधिकारी, एक पोलीस निरीक्षक, आठ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, 175 कर्मचारी, होमगार्ड, एक दंगा नियंत्रण पथक, निमलष्करी दलाची एक तुकडी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या असा बंदोबस्त असेल.

फलटण मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी फलटण शहरात एक उपविभगीय पोलीस अधिकारी, तीन पोलीस निरीक्षक, दहा सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, एक दंगा नियंत्रण पथक, निमलष्करी दल व राज्य राखीव पोलीस दलाची प्रत्येकी एक तुकडी, 225 पोलीस कर्मचारी, होमगार्ड असा बंदोबस्त असेल.

पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची राज्यभर असलेली चर्चा आणि “हाय व्होल्टेज’ लढत पाहता मतमोजणी दरम्यान शांतता राखण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कायदा हातात घेतल्यास कारवाईचा इशारा
निवडणुकीच्या निकालामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असणे स्वाभाविक आहे; परंतु कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, असे वर्तन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. मतमोजणीत कुणाला काही आक्षेप असतील तर ते सनदशीर मार्गाने प्रशासनाकडे नोंदवावेत. त्यांची दखल घेतली जाईल, मात्र, कोणी कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)