मतदान साक्षरता अभियान काळाची गरज – प्रांताधिकारी सुभाष भागडे

कार्ला : मतदान साक्षरता अभियनाची माहिती देताना प्रांतअधिकारी सुभाष भागडे.

कार्ला – लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत मावळ लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांचे आदेशावरुन प्रांत अधिकारी सुभाष भागडे यांचे मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय वडगाव येथे शाळा महाविद्यालय मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षक प्रतिनिधी यांची “मतदार जागृती अभियान’ राबविण्यासंदर्भातील सहविचार सभा संपन्न झाली.

मतदार जागृत साक्षर व्हावा आणि मतदानाचा टक्‍का वाढावा, तसेच मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी हे या अभियानाची मुख्य उद्दिष्टे आहेत. भविष्यात मतदार होणारे (फ्युचर वोटर्स – 9 वी ते 11 वी चे विद्यार्थी) व नव्यानेच मतदार झालेले (न्यू वोटर्स – 12 वी व त्यापुढील महाविद्यालयीन विद्यार्थी) यांच्या “मतदार साक्षरता क्‍लब’ स्थापन करुन त्यामार्फत अध्यापक-प्राध्यापक व विद्यार्थी यांनी समाजात जागृती करावी, असे या अभियानाचे स्वरुप आहे. याअंतर्गत शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी निबंध वक्‍तृत्व रांगोळी स्पर्धा. पथनाट्ये, रॅली, पालकसभा, मेळावे, पत्रक वाटप, घोषणा फलक आदी कार्यक्रमांचे आयोजन करुन अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.

नोडल अधिकारी महेंद्र वासनिक यांनी मतदान प्रबोधन आणि जनजागृती मोहीम यशस्वी करण्यासाठी आवाहन केले. प्रचार साहित्य निवडणूक कार्यालयाकडून पुरविण्यात येणार आहे. तसेच पालकांचे संकल्पपत्र आणि हमीपत्र लिहून घेण्याबाबत मार्गदर्शन केले. शाळांना भेटी देऊन या कार्याचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. सदर कार्याचा अहवाल लेखी व छायाचित्रांच्या स्वरुपात निर्धारित वेबसाईटवर अपलोड करण्याबाबत सूचनाही त्यांनी केली.
या वेळी तहसीलदार रणजित देसाई आणि नायब तहसीलदार (निवडणूक) आर. एल. कांबळे उपस्थित होते. व्ही. पी. एस. हायस्कूलचे पर्यवेक्षक विजय जोरी यांनी निवडणूक पदाधिकाऱ्यांना आभार मानले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here