मग निवडणूक कशाला लढविता…

युवा आक्रोश मोर्चात दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांची टीका

दौंड- विकासकामांसाठी तालुक्‍यात कोट्यावधींचा निधी आणल्याचे आमदार सांगतात. कामे केल्याचेही सांगतात, तरीही त्यांच्या गटाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जागा मिळवता आल्या नाहीत. माझ्या चार पट निधी तर लांबच, मग निवडणूक कशाला लढवता, अशी टिका माजी आमदार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केली.
दौंड येथे राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या युवा आक्रोश मोर्चात थोरात बोलत होते. थोरात यांनी सुरवातीला केंद्र तसेच राज्य सरकावर टिका केली. त्यानंतर ते तालुका पातळीवर बोलत होते. थोरात म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने जनतेला गाजर दाखविण्याचे काम केले असून किती दिवस गाजर दाखविणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, माझ्या आमदारकीच्या काळात शहरात सेंट्रल बिल्डिंग, अंडर ग्राउंड गटार, केबल अशी कामे झाली. मी माझ्या कार्यकाळात 443 कोटीची विकास कामे केली आणि आमदार मात्र सध्या सांगताहेत की तुमच्या चार पट निधी आणला नाही तर निवडणूक लढणार नाही. मात्र, सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विकासकामे केल्याचे बॅनर गावोगावी लावले तरी सुद्धा त्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला 25 हजाराचे लीड जनतेने दिले.
याप्रसंगी जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले, तालुकाध्यक्ष आप्पासो पवार, नगरसेविका प्रणोती चलवादी आदींची भाषणे झाली.
दौंड शहरात आज सकाळी मुख्य बाजारपेठेतून आक्रोश मोर्चाला सुरुवात होऊन तो तहसील कचेरीवर नेण्यात आला. यावेळी मोर्चात तीन गाढवे आणली होती. या मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार धनाजी पाटील यांनी स्विकारले. वाढत असलेली बेरोजगारी, सरकारने दिलेली खोटी आश्वासने, बंद असलेली शिष्यवृत्ती चालू करणे व दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करणे, युवकांना दोन कोटी रोजगार उपलब्ध कधी होणार? भाजपा नेत्यांची बेताल वक्तव्य, शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर दौंड शहर युवक अध्यक्ष सचिन गायकवाड, तालुकाध्यक्ष विकास खळतकर आदींसह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

  • टीका आणि अवाहनही…
    राष्ट्रवादी कॉंग्रेसने आजचा मोर्चा हा केंद्र आणि राज्य शासनाच्या फसव्या धोरणा विरोधात आयोजित केला होता. यामुळे या मोर्चात केंद्र आणि राज्य शासनावर टीकाही करण्यात आली. माजी आमदार रमेश थोरात यांनी ती टीका केली. मात्र, शेवटी त्यांनी दि. 2 फेब्रुवारीला केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री व व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दौंड येथे विकलांग साहित्य वाटपासाठी येत असून त्याठिकाणी लाभार्थ्यांस घेऊन या, असे आवाहन केल्याने मोर्चा शासनाच्या विरोधात आणि तेच शासन राबवित असलेल्या उपक्रमबाबत आवाहनही त्याच मोर्चात, अशा या विरोधाभासाची चर्चा मोर्चा संपल्यानंतर उपस्थितांत होती.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)