मंत्रिमहोदयांच्या गावातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता धोक्‍यात

रमेश पाटोळे : माण पंचायत समिती मासिक सभा

बिजवडी, दि. 29 (वार्ताहर) – पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री ना. महादेवराव जानकर यांचे गाव असलेले पळसावडे, ता. माण येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता धोक्‍यात आली असून शिक्षण विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी सभापती रमेश पाटोळे यांनी केली आहे.
दहिवडी, ता. माण येथे माण पंचायत समितीच्या सभागृहात मासिक सभा पार पडली. त्यादरम्यान ते बोलत होते. उपसभापती नितीन राजगे, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, तानाजी काटकर,तानाजी कट्टे, सौ. कविता जगदाळे, अपर्णा भोसले, रंजना जगदाळे, चंद्राबाई आटपाडकर, गटविकास अधिकारी जी. डी. शेलार, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत चौगुले, विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत लाभार्थी चुकीच्या माहित्या देऊन घरकुल मंजूर करून घेत आहेत. यात संबंधित अधिकारी -कर्मचारी दुर्लक्ष करत असून पात्र लाभार्थ्यांना योजना देण्यापेक्षा चुकीच्या माहिती देणाऱ्यांना योजना दिल्या असल्याचा आरोप पाटोळे यांनी केला आहे. याचे सर्व पुरावेही सादर करणार आहे. शाळेच्या दैनंदिन वेळेत रजा न टाकता शिक्षक मुलांना वाऱ्यावर सोडून विवाह सोहळ्यांना उपस्थिती दाखवत असतात. अनेकदा या सोहळ्यांना दहा ते बारा शिक्षक दिसून येतात. मग ते रजा टाकून येतात की दांडी मारून येतात. त्यावेळी विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्नही पाटोळे यांनी उपस्थित केला.
उपसभापती नितीन राजगे म्हणाले, तालुक्‍यात अनेक शाळांना स्वच्छतागृहे नाहीत. आहेत त्यातील काहींची दूरवस्था झाली आहे. सर्व सोयी-सुविधा पुरवण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्राथमिक शाळांच्या भेटीस गेल्यानंतर पदाधिकाऱ्यांना शिक्षकवर्ग अपमानापस्द वागणूक देत असतात. त्यांच्याविरोधात शिक्षणविभाग कोणती भूमिका घेणार? असा सवाल राजगे यांनी केला. सौ. कविता जगदाळे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“त्या’ शिक्षकावर कारवाई होणार का?
पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री ना. महादेवराव जानकर यांचे गाव असलेले पळसावडे, ता. माण येथील जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षक कुंभार हे पान, गुटखा खाऊन शाळेत जात असून त्यांच्या उपस्थितीत तेथील मुलांची गुणवत्ता ढासळत चालली आहे. पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिल्यास शेरेबुक काय असते ते मला माहित नाही असे उध्दटपणे बोलत असतात. अशा शिक्षकावर कारवाईची करण्याची मागणी सभापती रमेश पाटोळे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)