मंडळे नियम पाळतात का?

– सागर येवले

पुणे – नवरात्री आणि गणेशोत्सव साजरे करण्यासाठी मंडळांना पोलीस आणि महापालिका प्रशासनाबरोबरच धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे उत्सवानंतर 15 दिवसांच्या आत मंडळांनी जमा-खर्चाचे लेखापरीक्षण धर्मादाय कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, कोणत्याच मंडळांकडून हे लेखापरीक्षण येत नसून, “रात गई, बात गई’ अशी परिस्थिती उत्सवानंतर दिसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील विविध शहरांमध्ये सण, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सार्वजनिक कार्यक्रम किंवा उत्सवासाठी वर्गणी जमा करायची असल्यास धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, त्याबाबत बहुतांश संस्था, संघटना आणि मंडळांना कल्पना नाही. ज्यांना माहिती आहे त्यातील काहीच मंडळे आणि संस्था परवानगी घेतात. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून अंदाजे चार हजारांच्या वरती छोटी-मोठी गणेश मंडळे आहेत. तर जिल्ह्यातील मंडळांची संख्या ही वेगळीच आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करताना मंडळांना पोलीस, महापालिका-नगरपालिका, अग्निशमन विभागाकडून विविध परवानग्या घ्यावा लागतात. त्यासाठी मंडळांची लगबग सुरू असते. परंतू, या तीन विभागाच्या परवानग्यांसह धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाकडून वर्गणी जमा करण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतू, दरवर्षी चार हजार गणेशमंडळांपैकी केवळ एक ते दीड हजार मंडळेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेत असल्याचे निदर्शनास येते.

मागील चार वर्षांपासून गणेशमंडळांना परवाने त्वरीत मिळावे, यासाठी स्वतंत्र कक्ष उभारून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे मंडळांना त्वरीत परवाने दिले जात आहे. तसेच उत्सवानंतर दहा दिवसांच्या जमा-खर्चाचे लेखापरीक्षक धर्मादाय कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, ज्या प्रमाणात परवानगीसाठी अर्ज येतात त्याच्या दहा टक्केही “लेखापरीक्षण’ कार्यालयाकडे येत नाही. दरम्यान, पोलीस किंवा महापालिका यांची परवानगी घेतली नाही तर कारवाई होऊ शकते, अडचणी निर्माण होऊ शकतात, या भीतीपोटी मंडळे प्रथमत: पोलीस आणि महापालिकेच्या परवानग्या घेतात. मात्र, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे मंडळेही परवानगी घेण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे “लेखापरीक्षण’ सादर करण्याचा प्रश्‍नच येत नाही. परंतू, याबाबत मंडळांमध्ये जनजागृती होणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)