मंचर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण उपाशी

पोटभर जेवण देण्यास टाळटाळ

मंचर- येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेकेदारांकडून रुग्णांना दिले जाणारे जेवण पुरेसे नसल्याने अनेक रुग्णांना उपाशी रहावे लागत आहे. तर काही रुग्णांना बाहेरुन विकतचे जेवण आणावे लागत आहे. मंचर उपजिल्हा रुग्णकल्याण समितीचे सदस्य जगदीश घिसे यांनी याप्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मंचर उपजिल्हा रुग्णालयात बाळंतपणासाठी किंवा विविध शस्त्रक्रियेसाठी निवासी आलेल्या रुग्णांना मोफत जेवण ठेकेदारामार्फत देण्यात येते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून जेवण व्यवस्थित मिळत नसल्याची ओरड होत होती. मंचर उपजिल्हा रुग्णालय रुग्णकल्याण समिती सदस्य घिसे आणि पत्रकारांनी अचानकपणे मंचर उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन जेवणाची तपासणी केली. तसेच रुग्णांच्या जेवणाच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका चंदाराणी पाटील आणि जेवण पुरविणारे ठेकेदार तुषार साकोरे उपस्थित होते.

त्यावेळी जेवण देताना आम्हास दोन ऐवजी एक चपाती दिली जाते. तसेच जेवणास चवही नसते. अशा तक्रारी रुग्णांनी केल्या. दररोज 70 ते 80 रुग्णांना जेवण दिले जाते.परंतु, पोटभर जेवण मिळत नसल्याने अनेक रुग्ण उपाशी राहत आहेत. काही रुग्णांना बाहेरुन विकतचे जेवण आणावे लागत आहे. तसेच ठेकेदाराचा किराणा भुसार माल खरेदीचा परवाना साताऱ्याचा आणि त्याचा वापर मंचर उपजिल्हा रुग्णालयात होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सकाळी नाष्टा, जेवण आणि संध्याकाळी जेवण दिले जाते. परंतु, तेही वेळेवर मिळत नसल्याचे रुग्णांनी सांगितले.

  • रुग्णांना चांगले जेवण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच किराणा भुसार परवाना मंचर येथे काढला जाईल. रुग्णांच्या जेवणाबद्दल सर्व तक्रारी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
    तुषार साकोरे, ठेकेदार
    किराणा भुसार परवान्याची ठेकेदाराकडे मागणी करुनही आम्हाला मिळाला नाही. जेवणाबद्दल रुग्णांच्या तक्रारी आहेत. त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला जाणार आहे.
    डॉ. चंदाराणी पाटील, वैद्यकीय अधिक्षिकामंचर उपजिल्हा रुग्णालय
  • जेवणाबद्दल रुग्ण नाराज आहेत. जेवणाबद्दलच्या तक्रारीची दखल घेऊन वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. तसेच जर रुग्णांना जेवण चांगले मिळणार नसेल तर आंदोलन केले जाईल.
    जगदीश घिसे, सदस्य, मंचर उपजिल्हा रुग्णकल्याण समिती

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.