पिंपरी – भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव अवघ्या 15 मिनिटांमध्ये विनाचर्चा न करता गदारोळात मंजूर करण्यात आला. करदात्याच्या पैशांची लूट करण्याचा डाव त्यामागे असून हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
शिवसेनेचे पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी भोसरी रुग्णालय उभारले जाणार होते. मात्र, हे रुग्णालय बांधल्यानंतर अचानकपणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना हे रुग्णालय आपण चालवू शकत नसल्याचा साक्षात्कार झाला. 22 कोटी खर्च होईपर्यंत महापालिका अधिकाऱ्यांना ही बाब समजली नाही का. महापालिकेने हे रुग्णालय चालविल्यास भोसरी भागातील गरीब व गरजू लोकांना मोफत उपचार मिळतील. त्यामुळे भोसरी विभागातील नामांकीत डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.
कोणत्या अधिकाऱ्याला आपण हे रुग्णालय चालू शकत नाही याचा साक्षात्कार झाला त्या अधिकाऱ्याचे नाव जाहीर करावे. महापालिकेला शहराचा विकास दर वाढवायचा आहे की? महापलिकेतल्या अधिकारी राज्यकर्ते व खासगी संस्थाचा विकास दर वाढवायचा आहे ? असा सवाल शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मागे न घेतल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा ननावरे यांनी दिला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा