भोसरीच्या आखाड्यात बारा जणांनी ठोकले शड्डू

दत्ता साने, जालिंदर शिंदे यांची माघार

पिंपरी – भोसरीच्या आखाड्यात बारा जणांनी शड्डू ठोकल्याचे आज (सोमवारी) स्पष्ट झाले. अपेक्षेप्रमाणे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांच्यासह सहा जणांनी माघार घेतली आहे. तर आमदार महेश लांडगे व माजी आमदार विलास लांडे हे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

भोसरीतून 20 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अर्ज छाननीत दोन अर्ज बाद झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सहा जणांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. या मतदार संघात राष्ट्रवादीकडून विलास लांडे, दत्ता साने व जालिंदर शिंदे हे इच्छुक होते. मात्र, या तिघांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. अपेक्षेप्रमाणे दत्ता साने व जालिंदर शिंदे यांनी आपले अर्ज मागे घेत विलास लांडे यांना पाठिंबा दिला.

भोसरीच्या रिंगणात आता बारा उमेदवार राहिले आहेत. यामध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे महेश लांडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्यासह वहिदा शेख (समाजवादी पक्ष), राजेंद्र पवार (बहुजन समाज पक्ष), ज्ञानेश्‍वर बोराटे (बीआरएसपी), विश्‍वास गजरमल (जनहित लोकशाही पक्ष), शहानवाज शेख (वंचित बहुजन आघाडी), विजय आराख (बहुजन मुक्ती पक्ष), भाऊ आडागळे (महाराष्ट्र मजदूर पक्ष), छाया संजय जगदाळे, हरेश डोळस, मारुती पवार (अपक्ष) यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.