भोर तालुक्‍यात 7 हजार 600 हेक्‍टरवर भाताची लागवड

भोर- भोर तालुक्‍यात यावर्षी 7 हजार 600 हेक्‍टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली असून यात 50 एकर क्षेत्रावर यंत्राद्वारे भाताची लागवड करण्यात आली आहे. तसेच यंदा भाताचे भरघोस उत्पादनात वाढ होणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.
भोर तालुक्‍यात या वर्षि समाधानकारक आणि वेळेवर पर्जन्यमान होत असल्याने भात पिकाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोर तालुक्‍यातील मुख्य पीक असलेल्या भाताची खाचरे बहरली असून मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी भात पिकाचे उत्पादनात भरघोस वाढ होणार असल्याने बळीराजाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील पसूरे वेळवंड, महुडे, वेळवंड, हिर्डोशी, आंबवडे, आंबाडे आणि वीसगांव खोऱ्यात मोठ्याप्रमाणावर भाताचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शनपर शेतकरी मेळावे घेऊन प्रबोधन केले असल्याने सुधारीत पद्धतीने भाताची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने कृषी विभागाने सुचवलेल्या भात वाणांचीच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. यात इंद्रायणी, फुले समृद्धी, रत्नांगिरी 24, या वाणांचा समावेश आहे.
यावर्षी वेळेवर होणारे पर्जन्यमान आणि वेळेत झालेली भात रोपांची लागवड यामुळे भाताची शेती हिरवीगार झाली असून पिक जोमाने बहरले आहे. त्यामुळे या वर्षीच्या पीक हंगामात भाताचे उत्पादनात अंदाजे 10 ते 15 टक्के वाढ होईल अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. मागील वर्षी हेक्‍टरी 2 ते 2.5 हजार किलो उत्पादन मिळाले होते ते या वर्षी 4 हजार क्विंटल पर्यंत मिळेल असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे. मात्र, त्यासाठी पर्जन्यमान ही टिकुन राहाणे गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले. पावसाने जरी पुढिल काळात धोका दिला तरी कृषी विभागाने तयार केलेल्या वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग भात पिकाला होऊन भाताचे पिक उद्दीष्टा एवढे घेता येणे शक्‍य आहे. मात्र, अति दुर्गम डोंगरी भागातील भाताची लागवड महिनाभर आधीच होत असल्याने तेथील भात पिकास आवश्‍यक तेवढा पाऊस पुरेसा होऊन भात पिकाचे उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
यंत्राच्या सहाय्याने भात पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा ही घेतल्या व शेतकऱ्यांचे प्रबोधन केले मात्र, त्यास हवातेवढा प्रतिसाद अद्यापपर्यंत मिळत नसल्याची खंत असून या योजनेत आत्माकडून शेतकऱ्यास भातलावणी यंत्र खरेदीसाठी 50 टक्के अनुदान शासन देते, तर भात लागवडीसाठी शेतकऱ्यास 2 हजार मशीन भाडे, नर्सरीसाठी 2 हजार, व लागवडीसाठी 2 हजार रुपये असे एकूण 6 हजार रुपयांचे शासन अनुदान देते. त्यामुळे अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भात लागवड केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होईल मात्र, यासाठी शेतकऱ्यांची माणसिकता निर्माण करण्याचे कृषी विभागासमोर मोठे आव्हान आहे. हे आव्हान पार करण्यासाठी नसरापूर 2, भोर परिमंडळ 2, भोर 1(पूर्व विभाग) असे एकूण तीन विभागात प्रत्येकी 2 कृषी पर्यवेक्षक कार्यरत असून ते शेतकऱ्यांना पीक वाढीसाठी प्रबोधन करीत आहेत.

  • या क्षेत्रावर मशिनने केली लागवड
    भोर तालुक्‍यातील हातवे, सणसवाडी येथे 15 एकर, महुडे येथे 5 एकर, नाटंबी येथे 20एकर क्षेत्रावर मशिनने भातलागवड केली आहे. तर मध्यंतरी पावसाने ओढ दिली होती त्यामुळे खानापूर येथील नर्सरीतील रोपवाटीकांचे नुकसान झाल्याचे तालुका कृषी तंत्रज्ज्ञ कणसे यांनी सांगितले.
  • सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव
    खरीप हंगामात भोर तालुक्‍यात भात पिकां व्यतिरिक्त नाचणी 900 हेक्‍टर, वरी 200 ते 250 हेक्‍टर, भूईमुग 1700 ते 1800 हेक्‍टर, याशिवाय घेवडा, चवळी, उडीद, या सारखी कडधान्याची पिके 600 ते 700 हेक्‍टरवर पेरणी केलेली आहे. तर सोयाबीनचे सुमारे 2500 हेक्‍टरवर पिक घेतले असून या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्यांनी या पिकावर किड नियंत्रणासाठी औषध फवारणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)