भोर कॉंग्रेसमध्येही खदखद उफाळली

आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले सवाल

भोर- भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्‍यातील कॉंग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याकरिता आमदार संग्राम थोपटे यांनी सोमवारी (दि.8) बैठक आयोजित केली होती. परंतु, यावेळी सर्वांनी मतांऐवजी संतापच व्यक्त करीत आघाडीला विरोध दर्शविला. 1999च्या पराभवाचा वचपा काढण्याची हिच वेळ असल्याचे अनेकांनी सांगितले. लोकसभेला आघाडी करुन विधानसभेला धोका देणाऱ्यांवर विश्वास कशाला ठेवता, असे मत व्यक्त करीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मनातील खदखद उफाळून आली.
लोकसभा निवडणुकीकरिता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसह मित्र पक्षांची आघाडी झाली असली तरी भोर विधानसभा मतदार संघात विळ्या-भोपळ्याचे वैर असल्याने आघाडीपेक्षा बिघाडी होण्याचीच चिन्हे दिसू लागली होती. त्यातच राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या सौभाग्यवती कांचन कुल यांना उमेदवारी देवून राष्ट्रवादीपुढे आव्हान निर्माण केले. आमदार थोपटे आणि राहुल कुल यांची मैत्री सर्वश्रृत असल्याने भोरमधून सुळे यांना विरोध होणार, हे नक्की असताना. सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार थोपटे यांनी हजेरी लावल्याने थोपटे यांची नेमकी भूमिका काय? याकडे कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते.

यामुळेच आमदार थोपटे यांनी विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याकरिता सोमवारी (दि.8) राजगड ज्ञानपिठच्या फार्मसी हॉलमध्ये विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत कॉंग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीशी आघाडीबाबतच्या मुद्यावर नकार घंटा वाजविण्यास सुरूवात केली. त्यातूनही थोपटे यांनी सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसह मित्र पक्षांची महाआघाडी झाली असून आपल्याला आघाडी धर्माचे पालन करावे लागेल, असा आदेशही आमदार थोपटे यांनी दिला. परंतु, त्यानंतरही कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करून दाखविली.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि भोर-वेल्हा विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना लक्ष केले. त्यांचा पराभव झाल्याचे शल्य आजही कॉंग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आहे. आता, लोकसभेला आघाडी करणारे हेच शरदराव पवार आणि त्यांचे नेते विधानसभा आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, राजगड साखर कारखाना, भोर नगरपरिषद आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पॅनल उभे करून कॉंग्रेसला त्रास देतात. अशातही कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते समर्थपणे तोंड देऊन कॉंग्रेसची ताकद वेळोवळी दाखवित आले आहेत. याशिवाय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झालेली असताना खासदार सुळे यांनी भोर तालुक्‍याचा दौरा कॉंग्रेसच्या कोणत्याच पदाधिकारी, कार्यर्त्यांला विचारात न घेता केला, त्यामुळे कॉंग्रेस पक्षात नाराजीचा सुर असल्याचे सर्वांनी बोलून दाखविले.

  • बेरोजगार युवकांतही नाराजी…
    भोर विधानसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना दोन वेळा खासदार म्हणून निवडून देताना भरघोस मतदान झाले आहे. परंतु, भोरच्या औद्योगिक वसाहतीचा प्रश्‍नांतून सुशिक्षीत पदवीधर तरुणांमध्ये यावेळी नाराजीचा सूर आहे. याच प्रश्‍नावर सुशिक्षीत तरुणांनी रविवारी (दि.7) एक विशेष बैठक भोरमध्ये आयोजित केली होती. यामध्ये मतदानाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय युवकांनी घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे भोर विधानसभा मतदार संघात कोण लिड घेणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.