भेदाभेद अमंगळ! (अग्रलेख)

केंद्र व राज्य सरकारे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देत आहे. देशातील जातीयता कमी व्हायची असेल, तर अशा विवाहांची संख्या वाढणे आवश्‍यक आहे; परंतु तसे करणाऱ्यांचा स्वीकार करण्याची समाजाची अजूनही मानसिकता नाही. केवळ अडाणी, अशिक्षित लोकच परधर्मातील, परजातीतील विवाहांना विरोध करतात असे नाही, तर उच्चशिक्षित लोकही त्याला अपवाद नाही. जेव्हा आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांचा प्रश्‍न येतो, तेव्हा मात्र कुटुंबातून मान्यता मिळेल की नाही, याची धास्ती मुला-मुलींना असते. कुटुंबाने स्वीकार केला, तर समाज स्वीकारत नाही. बऱ्याचदा युवक-युवती कुटुंब, समाजाचा विरोध पत्करून असे विवाह करतात; परंतु नंतर त्यांना कुटुंबापासून दूर जावे लागते. सामाजिक बहिष्काराचे बळी व्हावे लागते.
नाशिकमध्ये बरोबर पाच वर्षांपूर्वी मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने तिच्या आईवडिलांवर कुटुंबाने बहिष्कार टाकला. त्यामुळे जगणेच असह्य झाल्याने आपल्या गरोदर मुलीचा तिच्या वडिलांनीच निर्घृण खून केला. त्यावरून “ऑनर किलींग’च्या महाराष्ट्रातील प्रकारांविरोधात आवाज उठविण्यात आला. महाराष्ट्र सरकारने त्याविरोधात कायदा केला. नाशिकच्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली; परंतु अजूनही आपली मानसिकता बदलायला तयार नाही. आपण अजूनही मध्ययुगीन मानसिकतेचे आपण बळी ठरतो आहोत. एका वर्षात देशात आठशेहून अधिक “ऑनर किलींग’चे प्रकार होत असतील, तर अजून आपल्याला किती मजल मारायची आहे, हे लक्षात येते. संत तुकारामांनी “विष्णुमय जग भेदाभेद अमंगळ’! असे म्हटले आहे. आपल्याकडे तर जात, धर्म, प्रांत, वेश अशा सगळ्याच बाबीवरून भेदाभेद केला जात आहे.
आपल्याला एवढा चांगला वैचारिक वारसा लाभलेला असताना आपण जातीपातीच्या, उच्च-नीचतेच्या कालबाह्य आणि मानवतेला कमी लेखणाऱ्या कल्पनांना का कवटाळून बसलो आहोत, हेच कळत नाही. राजस्थानमधील बारमेर येथे मुस्लीम तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने एका दलित तरुणाची हत्या करण्यात आली. एकीकडे आपले सर्वोच्च न्यायालय अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत आहे. दुसरीकडे दुसऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा सन्मान करण्याचे सोडून त्यांना थेट या जगातून उठविण्याच्या कृती घडत आहे. गोवंश तस्कराच्या संशयावरून झालेल्या हत्या, अफवांचा आधार घेऊन केलेल्या हत्या असोत की, दुसऱ्या जातीतील तरुणाशी केलेला विवाह मान्य नसल्यामुळे केलेल्या हत्या; या घटना एकाच विकृत मानसिकतेतून होत आहेत.
एखाद्या मुला-मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणजे खूप मोठा गुन्हा केला अशातला भाग नव्हे. विचार पटले, मने जुळली की, असे विवाह होतात. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना केवळ पैसे 
आणि भांडीकुंडी देऊन त्यांचे संसार व्यवस्थित होत नाहीत, तर असे संसार करण्यासाठी ती जोडपी जिवंत राहतील, याची खात्री सरकारने द्यायला हवी. 
राजस्थानमधील खेतराम भीम हा मेहबूब खान यांच्या घरी काम करायचा. त्यांच्या घरातील तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. सदाम खान आणि हरियत खान यांनी खेतरामला शेतात बोलावले. खेतराम पोहोचल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. हात बांधून त्याला मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. नंतर त्याचा मृतदेह काही अंतरावर फेकून देण्यात आला. ही घटना नगर जिल्ह्यातील सोनईच्या घटनेशी साधर्म्य सांगणारी आहे. एका अतिशय पिछाडलेल्या समाजातील तरुणाचे अन्य समाजातील तरुणीशी प्रेमसंबंध होते. संबंधित तरुणीही त्याच्याशी लग्न करायला तयार होती; परंतु कुटुंबीयांच्या दबावामुळे ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली नाही. त्यात तिघांचा बळी गेला.
खर्ड्यातही अशीच घटना घडून नितीन आगे या शाळकरी मुलाचा बळी गेला. त्यानंतर ज्या मुलीवर त्याचे प्रेम होते, तिच्या शिक्षणाचे काय झाले, हे पाहायला कुणाला वेळ मिळाला नाही. दुसऱ्या एका घटनेत, उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे एका 25 वर्षीय मुस्लीम युवकाला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यात आलेला युवक मूळ मध्य प्रदेशचा आहे तर तरुणी उत्तर प्रदेशचीच आहे. नोएडामध्ये एकाच कंपनीत काम करत असल्यामुळे दोघांची ओळख झाली होती आणि नंतर त्याचे प्रेमात रूपांतर झाले. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. गाझियाबाद न्यायालयात विवाह नोंदणीची प्रक्रिया सोपी आणि तातडीने होईल असे एका मित्राने सांगितले होते. त्यामुळे ते न्यायालयात पोहोचले; परंतु न्यायालयाच्या आवारातच काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.
उत्तर प्रदेश व केरळमध्ये “लव जिहाद’ च्या मुद्द्याला धार्मिक रंग देऊन त्यावर मतांचे ध्रुवीकरण करण्याचे राजकारण जोरात आहे. शिक्षणातून पुस्तकीज्ञान तर मिळतेच; पण शिक्षणामुळे प्रगल्भता येते, असे म्हटले जाते; परंतु अशा घटना पाहता खरेच समाज प्रगल्भ होतो आहे, या प्रश्‍नाचे उत्तर होकारार्थी मिळत नाही. कोणत्याही गावात मातब्बर असामी असतात. गावात त्यांचा दरारा असतो. खेडवळ नागरिकांच्या मनातही त्यांच्याबद्दल आदराची, सन्मानाची भावना असते. अशा मंडळींनाही आपला आत्मसन्मान जपण्याचा पूर्ण अधिकार आहे; पण तो बंदुकीच्या अथवा चाकू-सुऱ्याच्या धाकावर नव्हे, तर गावकऱ्यांशी आपलेपणा ठेवूनच. एखाद्या मुला-मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणजे खूप मोठा गुन्हा केला अशातला भाग नव्हे. विचार पटले, मने जुळली की, असे विवाह होतात. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना केवळ पैसे आणि भांडीकुंडी देऊन त्यांचे संसार व्यवस्थित होत नाहीत, तर असे संसार करण्यासाठी ती जोडपी जिवंत राहतील, याची खात्री सरकारने द्यायला हवी.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)