भुयारी कालव्याचा खर्च कोण उचलणार?

पालिका, पाटबंधारे विभागात नव्या वादाला तोंड फुटणार

पुणे – भुयारी कालवा करण्याला नियामक मंडळाची मान्यता घेण्यात आली आहे. तसेच तो करण्यासंदर्भात काही कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र भुयारी कालवा करण्याचा खर्च महापालिकेला करावा लागणार असेही महाजन यांनी स्पष्ट केल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कालवा दुरुस्ती कोण करणार यावरून गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या वादामुळेच आज ही परिस्थिती उद्‌भवली आहे. या शिवाय शहर भागातून कालव्याचा जो भाग आहे, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती होते. त्यातून दरवर्षी किमान दोन टीएमसी पाणी वाया जाते. अशा परिस्थितीतही हा कालवा दुरुस्त कोण करणार, मुख्यत्त्वे त्याला पैसे कोण देणार यावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे.

पाटबंधारे खाते म्हणते महापालिकेने मिळालेल्या पाणीपट्टीतून हा खर्च करावा आणि महापालिका म्हणते कालवा पाटबंधारे खात्याच्या अखत्यारितला विषय असल्याने त्यांनी तो दुरुस्त करावा. याशिवाय पाण्यासाठी महापालिका पाटबंधारे खात्याला पैसे देतेच म्हणजे पाणी विकत घेते. त्यामुळे कालव्याचा दुरुस्तीचा खर्च आम्ही करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. तो पाटबंधारे खात्यानेच करावा, असे भांडण गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यातच आता सुमारे साडेबाराशे ते तेराशे कोटी रुपयांच्या खर्चाच्या बोजाचा विषय चर्चिला गेला आहे. महापालिकेने आधीच चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे काढले आहेत. त्यातून नदी स्वच्छता, मेट्रो प्रकल्प आणि अन्य हजारो कोटी रुपयांचे अनेक प्रकल्पही सुरू आहेत.त्यात पालिकेलाही स्वत:चा हिस्सा द्यावा लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीत आणखी बाराशे-तेराशे कोटी रुपयांचा बोजा महापालिका सहन करू शकणार आहे का, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

प्रकल्पाला अद्याप सुरुवात झाली नसताना एवढा खर्च सांगितला जात आहे. मात्र सर्व प्रक्रिया होऊन, वादा-वादी होऊन, विरोधकांचा विरोध मावळून, सर्व परवानग्या घेऊन काम सुरू होईपर्यंत अनेक वर्षे जाणार आहेत, परंतु त्याचबरोबर या प्रकल्पाचा खर्चही तेवढ्याच वेगाने वाढणार आहे. समान पाणीपुरवठा, मेट्रो अशा पूर्वीच्या प्रकल्पांचा विचार करता बाराशे-तेराशे कोटी रुपयांचा प्रकल्प किमान अडीच-तीन हजार कोटी रुपयांवर जाणार हे निश्‍चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)