भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण: एटीएसचे छापासत्र; पाच जणांना अटक

देशभरातील सहा शहरांमध्ये छापे : महत्वाची कागदपत्रे जप्त

पुणे – बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून मुंबई, ठाणे, दिल्ली, हैद्राबाद, फरिदाबाद आणि रांची या शहरातील सहा जणांच्या घरावर पुणे शहर पोलिसांनी मंगळवारी छापे टाकले. त्यांच्या घराची झाडाझडती घेत कागदपत्रे, लॅपटॉप, पेनड्राईव्ह आदी साहित्य जप्त केले आहे. त्यातील हैदराबाद येथील कवी वरवरा रावसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरवरा राव (रा. हैद्राबाद, तेलंगणा), गौतम नवलखा (रा. दिल्ली), सुधा भारव्दाज (रा. फरिदाबाद, हरियाना), वरनोन गोन्साल्विज (रा. मुंबई) आणि अरूण परेरा (रा. ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह स्टॅन स्वामी (रा. रांची, झारखंड) यांच्या घराचीही झडती घेत त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पुणे शहरात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. त्यानंतर कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळला होता. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास करीत एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे (मुंबई) तसेच रोना विल्सन (दिल्ली), अॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन आणि महेश राउत (तिघे रा. नागपूर) यांना पुणे शहर पोलिसांनी अटक केली होती.

देशात बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी ते संबंधित असून एल्गार परिषदेच्या आयोजनात माओवाद्यांनी पैसा पुरविल्याचे तपासातून निदर्शनास आले आहे. अटक पाच जणांची चौकशी केली तसेच त्यांच्या घरात सापडलेली कागदपत्रे, ई-मेल, आदींची पडताळणी केली. त्यामध्ये वरवरा रावसह सुधा भारव्दाज, वरनोन गोन्साल्विज, अरूण परेरा, स्टॅन स्वामी, गौतम नवलखा या सहा जणांची नावे समोर आली.

ते एल्गार परिषदेप्रकरणी दाखल गुन्ह्यात यापूर्वी अटक आरोपींच्या संपर्कात होते आणि माओवादी चळवळीशी त्यांचा संबंध असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यानंतर पुणे पोलिसांचे पथक मुंबई, छत्तीसगड, हैद्राबाद येथे पोहोचले. वरावरा राव हे तेलंगणातील कवी आहेत. बंदी घातलेल्या माओवादी संघटनेला त्यांचे समर्थन आहे. त्याअनुषंगाने राव यांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली. स्वारगेट विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार एल्गार परिषद प्रकरणाचा तपास करत आहेत. सहाय्यक डॉ. पवार हे हैदाब्रादमध्ये राव यांची चौकशी करत आहेत.

सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रांची, हैद्राबाद, मुंबई, दिल्ली येथील काहीजणांची चौकशी सुरू केली असल्याचे सहपोलीस आयुक्त बोडखे यांनी स्पष्ट केले. एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी 2018 रोजी पुणे-नगर रस्त्यावरील भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार उसळला होता. भीमा-कोरेगाव हिंसाचारला चिथावणी देण्यात नक्षलवादी चळवळीशी जोडलेल्यांचा हात असल्याचा संशय होता. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांच्या पथकाने मुंबई, दिल्ली, नागपूर येथे एकाच वेळी छापे टाकून ढवळे, प्रा. सेन, विल्सन, अॅड. गडलिंग, राऊत यांना अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)