भीमाशंकर येथे वाहतूक कोंडींमुळे वाहनचालक त्रस्त

भाविकांच्या गाड्यांची रस्त्यावरच पार्किंग

मंचर- श्रीक्षेत्र भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र आहे. भीमाशंकरला जाण्यासाठी मंचर मार्गे जाता येते. सध्या या मार्गावर दररोज हजारो वाहने धावत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे भाविकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

वाहनचालक रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग करीत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या मार्गावर प्रवास करताना डिंभेपासून पुढे साबळेवाडी फाट्यापर्यंत पोखरी घाट लागतो. एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी असा मार्ग आहे. डिंभेपासून जवळच असलेल्या पोखरी घाटात अनेक धोकादायक वळणे व अरुंद रस्ता आहे. गेल्या पाच दिवसांपासून श्रीक्षेत्र भीमाशंकर, तळेघर, निगडाळे, राजपूर इत्यादी आदिवासी गावांत मुसळधार पाऊस पडत आहे. पाऊस पडल्यानंतर वाहणारे पाणी पुरेशी गटार व्यवस्था नसल्याने रस्त्यावरुनच वाहत आहे. त्यामुळे रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्या आहेत.

तर पाण्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने सावकाश जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. गुरुवारपासून (दि. 1) श्रावण महिना सुरू होत असल्याने श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील ज्योर्तिंलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक वाहनांसह येत असतात. त्यामुळे वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात उद्‌भवण्याची शक्‍यता असल्याने पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाहनतळ अपुरे पडत असल्याने वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने वाहनचालक रस्त्यालगतच वाहने पार्किंग करुन देवदर्शनासाठी जातात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.