भीमाशंकर अभयारण्यात पौर्णिमेच्या उजेडात प्राणी गणना

वेळवली येथील पाणवठ्यावर दिसला बिबट्या

मंचर- वन्यजीव विभागाच्या वतीने बुद्ध पौर्णिमानिमित्त भीमाशंकर अभयारण्यात प्राणी गणना करण्यात आली. जंगलातील 19 पाणवठ्यांच्या ठिकाणी मचानावर बसून वन विभागाचे कर्मचारी व निसर्गप्रेमी यांनी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची व त्यांच्या हालचालीची नोंद घेतली. यावेळी फक्त अभयारण्यातील वेळवली येथील पाणवठयावर बिबट्याचे अस्तित्व दिसून आले.

प्राणी गणनेत रानडुक्कर 14, भेकर 24, सांबर 31, काळतोंड वानर 59, भरतध्वज 5, घुबड 1, शेकरु 6, रानकोंबडी 2, काळे मांजर 1, ससा 6, मोर 1, साळीदर 1, पिसोरी 1 तर बिबट्या 1 असे प्राणी दिसले. कडक उन्हाळयाच्या मे महिन्यात जंगलात पाणी मोजक्‍याच ठिकाणी शिल्लक असते व पौर्णिमेच्या रात्री उजेड असल्यामुळे प्राणी दिसणे सोपे जाते, म्हणून बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना केली जाते. पाणवठ्याच्या ठिकाणी पालापाचोळयांनी बनविलेल्या मचानात बसून पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांवर लक्ष ठेवले जाते व त्यांचे निरीक्षण, गणना केली जाते.

वन्यजीव विभागाने काही पाणवठ्यांच्या जागी लोखंडी टॉवर उभे केले आहेत. याठिकाणी निसर्गप्रेमी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बसून प्राण्यांचे निरीक्षण केले.जंगलातील वांगीणदरा, घाटघर, चौरा, भट्टीचेरान, कुंभारखान, वेळवली, उघडी कळमजाई, कोथीरणे, वाजेवाडी, भागादेवी, विरतळे, संगमतळे, साकेरी तलाव, कारवीचादरा व वनस्पती पॉईंट या पाणवठयांच्या ठिकाणी गणना करण्यात आली. सहभागी निसर्गप्रेमींना ओळखपत्र देण्यात आली होती. ओळखपत्रासोबत सूचना व घ्यावयाच्या दक्षता यांची माहिती देण्यात आली.

यामध्ये मचानावर बसल्यानंतर एकमेकांशी बोलू नये, सहभागी निसर्गप्रेमींनी निसर्गाशी एकरुप होणारे कपडे घालावेत, उग्रवास असणारे सुगंधी द्रव्य कपड्यावर मारू नये, रात्री बॅटरी अथवा विजेचा वापर करू नये, कोणत्याही प्रकारे अन्नपदार्थ, प्लॅस्टिक बॅग अशा स्वरुपाच्या वस्तू जवळ बाळगू नये, मचाण चारही बाजूंनी हिरव्या फांद्यांनी झाकून घ्यावे अशा स्वरुपाच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

  • निसर्गप्रेमींना मिळाला वन्यप्राणी पाहण्याचा अनुभव
    एक रात्र जंगलात घालवून वन्यप्राणी पाहण्याचा चित्तथरारक अनुभव या प्राणी गणनेतून हौशी निसर्गप्रेमींना मिळाला. रात्री पौर्णिमेचा प्रकाश, रात किड्यांचा आवाज, रात्री जाणवणारी थंडी यामध्ये प्राणी गणनेची मजा वेगळीच असते. या प्राणी गणनेसाठी भीमाशंकर वन्यजीव विभागाने ठोस नियोजन केले होते.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×