#भाष्य : “मॉन्सून’चा पॅटर्न बदलला आहे! 

किरणकुमार जोहरे 

सरत्या आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागात आभाळाचं दान भरभरून मिळालं असलं तरी अद्यापही काही भाग कोरडा आहे. देशभरातही अशीच विषम स्थिती आहे. या बदलाचे कारण भारतातील मॉन्सूनचा पॅटर्न बदललेला आहे आणि अद्यापही त्यात बदल होणे चालू आहे. मान्सूनचे वारे वाहण्याची दिशा कायम असली तरी ती काहीशी पूर्वेकडे सरकली आहे. समुद्राकडून जमिनीवर येणारे व जमिनीवरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांची दररोजची वेळ व दिशा मुंबईसारख्या ठिकाणी देखील बदलती आहे. 

गेल्या काही वर्षांमध्ये मॉन्सून पॅटर्न बदलतोय. अवर्षण पॅटर्न देखील बदलत आहे असे दिसते तसेच वादळ निर्माण होण्याचे क्षेत्र देखील बदलत आहे. मात्र हवामान खाते पारंपरिक पद्धतीने स्टॅटिस्टिकल आणि न्यूमरिकल मॉडेलच्या मदतीने मॉन्सूनचे निष्कर्ष जाहीर करीत असल्यामुळे त्यांचे अंदाज चुकत आहेत. यंदा आयएमडीबरोबरच स्कायमेटसारख्या खासगी संस्थांचे देखील अंदाज चुकले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हवामानाचा नेमका अंदाज इस्त्राइल, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका; तसेच अन्य पाश्‍चात्य देशांमध्ये बांधला जात असला, तरी भारत अजूनही “काही भागात मध्यम, काही भागात हलक्‍या सरी, काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्‍यता आहे’ या अंदाजापुढे जाऊ शकलेला नाही. मागील काळात दक्षिण आफ्रिकेमध्ये दोन हवामान तज्ज्ञांचा अंदाज चुकला होता. त्यामुळे त्यांच्यातील एकाला तेथील शासनाने पाच वर्षे कारावास किंवा 6 लाख 14 हजार डॉलरचा दंड आणि दुसऱ्या तज्ज्ञाला 10 वर्षे शिक्षा व 1 लाख 24 हजार डॉलरचा दंड ठोठविला होता. रशिया आणि नेदरलॅंडमध्येही शासकीय हवामान शास्त्रज्ञांना दिलेल्या खोट्या अंदाजाबद्दल जेलची हवा खावी लागली होती. आपल्याकडे अंदाज चुकल्यानंतर अशा प्रकारची कारवाई होत नाही. याचे कारण अनुमान वर्तवणाऱ्यांवर उत्तरदायित्त्वाची जबाबदारीच नसते.

भारतातील मॉन्सूनचा पॅटर्न बदललेला आहे आणि अद्यापही त्यात बदल होणे चालू आहे. मॉन्सूनचे वारे वाहण्याची दिशा कायम असली तरी ती काहीशी पूर्वेकडे सरकली आहे. समुद्राकडून जमिनीवर येणारे व जमिनीवरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांची दररोजची वेळ व दिशा मुंबईसारख्या ठिकाणी देखील बदलती आहे. बंगालच्या उपसागरात खालच्या बाजूसही चक्रीवादळे निर्माण होऊ लागली आहेत. पूर्वेकडील व ईशान्येकडील राज्यांत पावसाची सरासरी वाढली आहे. पश्‍चिमेकडील दोन-तृतीयांश भागात पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. उत्तरेकडील एक तृतीयांश भारतात पावसाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आदी ठिकाणी ढगफुटीचे उत्तरेकडील प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रातील पावसात लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे; या व्यतिरिक्त एका तासापेक्षा कमी कालावधीत 100 मिलिमीटरपर्यंत अचानक कोसळणाऱ्या ढगफुटीच्या किंवा अतिवृष्टीच्या पावसाची संख्या तुलनात्मकदृष्ट्‌या वाढली आहे.

मॉन्सून सुरू झाल्यानंतर काही काळातच पाऊस “गायब’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. “मॉन्सून ब्रेक’ कालावधी वाढला आहे आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून तो चांगला बरसू लागतो. जूनमधील मॉन्सूनचे प्रमाण कमी होत आहे. मॉन्सूनची खरी सुरवात मे-जूनऐवजी थेट जुलैमध्ये होताना दिसते आहे. मॉन्सून ऑगस्टमध्येच खऱ्या अर्थाने सक्रिय होताना दिसतो. ऑक्‍टोबरमध्येही, आणि कधी कधी तर डिसेंबर-जानेवारी मध्ये देखील पाऊस होत आहे. कारण मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला आहे. परतताना देखील उशीर करीत हिवाळ्याचे दिवस त्याने कमी केले आहेत. भारतच नव्हे तर नेपाळ, भूतान, बांगलादेश तसेच पाकिस्तान या ठिकाणीही मॉन्सून पावसाचे प्रमाण बदललेले आहे.

मॉन्सून पॅटर्न बदलल्याच्या नोंदी 2003, 2004, 2008, 2009 या काळातील मॉन्सून वेगळा होता, या वर्षांत जून-जुलैमध्ये पाऊस कमी होता आणि ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तो अधिक होता. 2009 मध्येही नोव्हेंबपर्यंत मान्सून सक्रिय होता. 2010 मध्ये ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये तर मुसळधार पाऊस झाला आणि थेट डिसेंबपर्यंत पावसाचा मुक्काम होता. 2012 मध्ये देखील राजस्थानमधून फार उशिराने मॉन्सूनने प्रस्थान केले आणि गुजरातेत तो ऑक्‍टोबरमध्येही सक्रिय होता.

विदर्भात पावसाची सरासरी ही 954.9 मिलिमीटर आहे. मागील दोन वर्षांच्या आकडेवारीनुसार सरासरीपेक्षा 12 ते 15 टक्के कमी पाऊस पडल्याचे दिसून येते. पर्जन्यमान मोजणीच्या निकषांनुसार 19 टक्के कमी अथवा अधिक असलेला पाऊस हा सरासरीइतकाच मानला जातो. यानुसार दोन्ही वर्षी समाधानकारक पाऊस पडला. पण, या पावसात सातत्य नसल्याचे दिसून येते. 2014 मध्ये पावसात सातत्य होते. मात्र, 2015 मध्ये जुलै महिन्यात पावसाने तब्बल 18 दिवस उघाड दिला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत धो-धो पाऊस कोसळला. हीच स्थिती ऑगस्ट महिन्यातदेखील होती.

महिनाभरात जेमतेम आठवडाभर पाऊस पडला. या पावसाने महिन्याची सरासरी गाठली. यामुळेच पर्जन्यमान सरासरीइतके होत असले, तरी पावसाचा पॅटर्न बदलला आहे. हाच बदललेला पॅटर्न नागपूर जिल्ह्यात झालेल्या मागील सात वर्षांच्या पावसाबाबतही दिसून आला आहे. या सातही वर्षात पावसाच्या आकडेवारीत चढ-उतार दिसून आला आहे. 2011 आणि 2012 या सलग दोन वर्षे पाऊस 900 मिलिमीटरच्या जवळपास होता. मात्र, 2009 आणि 2014 मध्ये तो कमी पडला. 2014 मध्ये तर पर्जन्यमान 800 मि.मी.च्या खाली गेले. तर, 2010, 2013 आणि 2015 मध्ये पावसाने 1000 मिलिमीटरचा टप्पादेखील पार केला. 2013 मध्ये चक्क ऑक्‍टोबर महिन्यातदेखील जून इतकाच पाऊस पडला. त्यावर्षी मान्सूनच्या पावसाने 1300 मि.मी.चा टप्पा गाठला. हीच स्थिती नागपुरात पूर्व मोसमी पावसाबाबतदेखील आहे. 2009 ते 2011 दरम्यान मार्च ते मे या पूर्व मान्सून काळात पाऊस सरासरीइतका पडला. त्यानंतर दोन वर्षे या काळातील पर्जन्यमान एकदम घसरले. पण, 2014 व 2015 मध्ये मात्र सरासरीपेक्षा दुप्पट पूर्व मोसमी पाऊस कोसळला. मध्य महाराष्ट्रातही अशीच स्थिती दिसून येते. यावरूनच पाऊस पॅटर्न बदलत असल्याचे स्पष्ट होत आहे.

असे चुकले अंदाज 
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर केरळमधील आठ केंद्रांवर 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मॉन्सूनचे आगमन होते. यंदाच्या वर्षी सागर आणि मेकुणू या दोन वादळांच्या प्रभावाने केरळला जोरदार झालेल्या पावसामुळे, मॉन्सून लवकर आल्याची घोषणा उतावीळपणे हवामान खात्याने केली. वादळाच्या प्रभावामुळे मॉन्सून लवकर येत असल्याचा आभास निर्माण होत होता. वास्तविक राज्यात मॉन्सून आलेला नसतांनाच मान्सून पूर्वपाऊस हा मॉन्सूनचा दाखविण्याचा अट्टाहास हवामान खाते का करीत आले आहे? असा प्रश्‍न आहे. दुसरी गोष्ट, केवळ मॉन्सूनने सरासरी गाठली म्हणजे तो देशासाठी, शेतीसाठी आणि पर्यायाने सर्वसामान्यांसाठी उपकारक ठरतो, असे नाही. त्याचे आगमन, वितरण या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये बदल झाल्यास शेतकऱ्यांचे अर्थगणित कोलमडते. पेरणीच्या अंदाजातली चूक एकूण भारतीय शेतकऱ्यांचा विचार करता, फार धोक्‍याची आणि दूरगामी वाईट परिणाम करणारी ठरू शकते. शेतकऱ्यांच्या शेतीवर आणि पेरणीसाठी आणि शेत मशागतीसाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च यामुळे वाया जाऊ शकतो. यामुळे मॉन्सून पॅटर्न बदलाचे वारे लक्षात घेऊन हवामान खात्याने यापुढील काळात अंदाज वर्तवणे आवश्‍यक आहे. यासाठी हवामान खात्याच्या एकंदरीतच कार्यपद्धतीत सुधारणा होण्याची गरज आहे.

(लेखक मान्सूनचे अभ्यासक आहेत.) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)