#भाषा : भारतीय भाषेवरील परकिय भाषेचे कलम 

देविदास देशपांडे 

नव्या जमान्यात ज्ञान,विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे यासारख्या अनेक नवीन शाखांमध्ये नवे लेखन येणार, त्यांची स्वतंत्र परिभाषा येणार. ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण वाढल्याममुळे तेथील प्रादेशिक शब्दांचा समावेशही प्रमाण भाषेत होणारच. त्यामुळे नवीन शब्दभांडार निर्माण होणार आणि त्याचे आपण स्वागतच केले पाहिजे. शेवटी शब्दभांडार हीच कोणत्याही भाषेची समृद्धी असते. ‘आम्ही घरी धन शब्दांचीच रत्ने’ हे वाक्‍य अन्य कोणत्याही व्यक्तीपेक्षा भाषेलाच जास्त लागू होते. सुदैवाने आपल्या मराठीतील शब्दभांडार संपन्न आहे. फक्त त्यात भर घालायचा विसर आपल्याला पडता कामा नये! 

भारतात दोन रथयात्रा प्रसिद्ध आहेत. धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्‌या मातब्बरी म्हणावी तर ती दोन रथयात्रांची. एक ओडिशातील पुरीच्या भगवान जगन्नाथांची आणि दुसरी गुजरातच्या अहमदाबादची. या दोन्ही रथयात्रा साधारण एकाच वेळेस निघतात. यातील एका रथयात्रेने इंग्रजी भाषेला एक खूप प्रचलित असलेला शब्द दिला. या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला आणि इंग्रजीने त्याचा आत्मसात केलेला धर्म लक्षात घेतला तर आपणही भाषेबाबत एखादा धडा नक्कीच घेऊ शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जगरनॉट (Juggernaut) हा शब्द थोडे फार इंग्रजी वाचन असलेल्यांनाही परिचयाचा असतो. कोणत्याही अडथळ्याला न जुमानता पुढे जाणारा प्रवाह किंवा शक्ती असा त्याचा अर्थ. कुठल्याही कारणासाठी निःशंक (अंध) भक्ती आणि समर्पण असाही त्याचा एक अर्थ आहे. ‘जबरदस्त संहारशक्ति’ ही त्याच्या अर्थातील एक छटा होय. एखाद्या विशाल आकाराच्या वाहनालाही जगरनॉट नावानेच ओळखले जाते. हा जगरनॉट शब्द ही आपल्या भगवान जगन्नाथांचीच देणगी होय.

यामागची कथा अशी सांगतात, की पुरीतील जगन्नाथ यात्रा जेव्हा निघते तेव्हा साडे सहा फूट व्यास असलेल्या चाकांचा रथ बाहेर पडतो. हा रथ खेचायला 4 हजार स्वयंसेवक तैनात असतात. पूर्वीच्या काळी हा रथ अत्यंत वेगाने ओढण्यात येत असे आणि या रथाच्या चाकाखाली जी व्यक्ती प्राणत्याग करेल त्याला मोक्ष मिळेल, अशी समजूत होती. आता भारतीय लोक मुळातच श्रद्धावान. तेव्हा अनेक, नव्हे शेकडो लोक या रथाखाली स्वतःला झोकून देत.
ब्रिटिश भारतात आले आणि त्यांनी हे दृश्‍य पाहिले तेव्हा त्यांच्या दृष्टीने हा संहाराचा उत्सव ठरला नसता तर नवलच. त्यामुळे या जगन्नाथाचे त्यांनी ‘जगरनॉट’ म्हणजे ‘संहारशक्ति’ असे स्वरूप केले. चार्ल्स डिकन्स, रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन, एच. जी. वेल्स आणि लॉंगफेलो यांसारख्या लेखकांनी ‘जगरनॉट’ या शब्दाचा वापर करून हा शब्द लोकप्रिय केला.

दुसरीकडे मार्क ट्‌वेन या लेखकाने या शब्दाला मिळालेली नकारात्मक छटा काढून टाकण्याचा प्रयत्न केला. भगवान जगन्नाथ हा अत्यंत कृपाळू देवतांपैकी एक आहे असे मार्क ट्‌वेन यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
संपूर्ण विश्‍वात आज इंग्रजी ही क्रमांक एकची भाषा मानण्यात येते. तिचा प्रभावही जबरदस्त, मोहिनीही अगाध आणि सामर्थ्यही अफाट. तिच्या रेट्यापुढे अन्य भाषा म्हणजे किस झाड की पत्ती! म्हणजे एकप्रकारे जगरनॉट या शब्दाचा जो अर्थ तिचे मूर्तीमंत रूपच म्हणून इंग्रजीकडे बोट दाखवू शकतो. अशा या इंग्रजीने अन्य भाषांमधून किती शब्द घेतले याला गणती नाही. या हजारो शब्दांमागे किती संस्कृतीच्या कथा, किती प्रसंग आणि किती अनुबंध याची गणतीच नाही.

शब्दांच्या या मालिकेतील एक पुष्प म्हणजे हा जगरनॉट शब्द होय. पण भारतातून गेलेला हा काही इंग्रजीतील पहिलाच शब्द नाही. पंडित, लूट, मोगल, पॅलंकिन (पालखी), चिरूट, व्हरांडा, जिमखाना, ठग, करी असे किती तरी शब्द इंग्रजीने या भूमीतून घेतले, मायदेशी नेले आणि आपलेसे केले. आपलीच वस्तू दुसऱ्याच्या हाती गेल्यानंतर खूप वर्षांनी परत मिळावी आणि तिच्या मूळ स्वरूपाची आपल्याला आठवणही राहू नये, असे काहीसे या शब्दांबाबत आपले झाले आहे. ब्रिटिश या देशातून गेले म्हणजे त्यांची ही शब्दांची लूट’ थांबली, असे नव्हे. दोन-तीन वर्षांपूर्वी खिमा, पापड, बदमाश यासारख्या शब्दांनी ऑक्‍सफर्ड इंग्रजी शब्दकोशात स्थान मिळविले होते तेव्हाही त्याची मोठी चर्चा झाली होती.
फार कशाला, भारतीय मूळ असलेल्या आणि इंग्रजीत ठाण मांडून बसलेल्या शब्दांचा एक स्वतंत्र शब्दकोश आहे. हॉब्सन-जॉन्सन या नावाचा हा शब्दकोश आहे. हेन्‍री यूल आणि आर्थर कोक बर्नेल या दोन लेखकांनी हा शब्दकोश तयार केला असून त्यात सुमारे 2000 शब्द आहेत. या हॉब्सन-जॉब्सन शब्दाचीही एक गंमत आहे. अँग्लो-इंडियन लोकांच्या इंग्रजीत हॉब्सन-जॉब्सन या शब्दाचा अर्थ उत्सव किंवा मोठा सण असा होता. मात्र त्याचा संबंध मोहरमच्या मातमशी आहे.

भारतात आलेल्या ब्रिटिश सैनिकांना येथे आल्यावर मोहरमच्या काळात शोक करणारे मुस्लिम दिसले. हे मुस्लिम “या हुसेन, या हुसेन’चा पुकारा करायचे. याच ‘हुसेन, हुसेन’चे होस्सीन गोस्सीन, हॉसी गॉसी, होसेन जोसेन आणि शेवटी, हॉब्सन-जॉब्सन असे रूपांतर झाले. युले आणि बर्नेल हे आपल्या शब्दकोशासाठी एका आकर्षक शीर्षकाच्या शोधत होते. त्यांच्या भाषेत अगोदरच असलेल्या हम्प्टी डम्प्टी किंवा होकी-पोकी या शब्दांशी साधर्म्य असलेला आणि भारताशी थेट संबंध असलेला हा शब्द त्यांना सापडला आणि त्यांनी तो पुस्तकासाठी निवडला. हे हॉब्सन-जॉब्सनचे पुराण इथेच थांबले नाही. भाषाशास्त्रात हॉब्सन-जॉब्सनचा नियम (लॉ ऑफ हॉब्सन-जॉब्सन) हा एक शब्दप्रयोगच रूढ झाला आहे. शब्दांमधील बदलांसाठी हा नियम लावण्यात येतो. आपल्याकडे वर्णविपर्यय किंवा अपभ्रंश म्हणून ही प्रक्रिया ओळखली जाते. एखाद्या भाषेतून घेतलेल्या शब्दाचे रूप बदलते तेव्हा हॉब्सन-जॉब्सनचा नियम लागू झाला, असे म्हणता येईल. मराठीत रूढ झालेल्या फारशी शब्दांसाठी हा नियम मोठ्या प्रमाणात लागू करता येईल.

तर सांगायचा मुद्दा हा, की इंग्रजी आज या स्थानाला पोचली आहे याचे कारण तीसुद्धा जगन्नाथाचा रथ बनली आहे. जगन्नाथाच्या प्रवाहाप्रमाणेच तिच्यासमोर येणाऱ्या कुठल्याही भाषेला ती चिरडून टाकताना दिसते, कुठल्याही अडथळ्याला जुमानताना दिसत नाही आणि तिच्यासाठी स्वतःला समर्पित करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. अर्थातच यामागे मर्म आहे ते तिच्या सर्व समावेशकतेचे. जी भाषा समोर येईल तिच्यातील शब्द आत्मसात करून घेण्याची. आपण धडा घ्यायचा तो या बाबीचा. भारतात शब्दांना आत्मसात करण्याची अशी अफलातून क्षमता फक्त हिंदीने दाखवली आहे. म्हणूनच आज ती देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ठरली आहे. आपल्या भाषेचा अभिमान बाळगताना परकीय शब्दांचे हे कलम करून तिला समृद्ध करण्याकडे दुर्लक्ष होता कामा नये!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)