भाव नसल्याने कांद्याचा खत म्हणून वापर

बारामतीच्या जिरयाती भागातील वास्तव : अनेकांच्या शेतात कांदा काढून पडलेला

करंजे- चार पैसे मिळतील या अपेक्षेने चार-पाच महिन्यांपूर्वी हजारो रुपये खर्च करून चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा आता चाळीत गुदमरून सडू लागला आहे. तर किलोला चार-पाच रुपयांच्या पुढे वाढ होत नसल्याने व हा भाव परवडणारा नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे. नवा लाल कांदाही बाजारात येऊ लागल्याने चाळीत कांदा ठेवावा की नाही,भाव वाढतील का,आता विक्री केला अन्‌ उद्या भाव वाढले तर… असे प्रश्‍न शेतकऱ्यांची द्विधावस्था करीत आहेत. त्यातच बारामतीच्य जिरायती भागातील काही शेतकऱ्यांनी हा कांदा विकण्या आणि फेकण्यापेक्षा त्या कांदा शेतातच टाकून जैविक खत म्हणून वापर करीत आहेत.
भाव नसल्याने लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतातून झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कांद्याला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे जिरायती भागातील अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. एकीकडे दुष्काळाने तर दुसरीकडे भाव नसल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. कांदा हा जास्त दिवस साठवून ठेवता येत नसल्याने शेतकरी तो साठवून ठेवू शकत नाहीत. यात आजही बारामती तालुक्‍यातील मुर्टी, चौधरवाडी, वाकी, चोपडज रासकरमाळा, देऊळवाडीत अनेक गावांमध्ये कांदा शेतामध्ये पडून आहे. त्यामुळे बारामती तालुक्‍यातील शेतकरी ऐन दुष्काळात संकटात सापडला आहे. जिरयती भागातील अनेक शेतकऱ्यांनी कांद्याला बाजार वाढेल या हिशोबाने कांदा शेतातच काढून ठेवला असून काही शेतकऱ्यांच्या शेतात तर ते 100-200 पिशवी कांदा काढून पडला आहे;परंतु कांद्याला काही केल्या बाजारच वाढत नसल्याने कवडीमोलाने कांदा विकण्यापेक्षा हा कांदा घेऊन त्याचे खत केलेले काय वाईट अशी भावना शेतकऱ्यांची झाली आहे.

  • हेच उत्पादकांचे दुखणे
    राजकीय मंडळींकडून केवळ राजकारणासाठी कांद्याचा वापर केला जातो. कांद्याचे दर कमी होवोत किंवा वाढोत, राजकारण हे ठरलेले आहे. परंतु कोणत्याच राजकीय पक्षाने अजूनपर्यंत या प्रश्नावर मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला नाही. हेच कांदा उत्पादकांचे दुखणे आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)