भारत मुस्लिम विरहीत कधीच होणार नाही

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरील चर्चेला अमित शहा यांचे उत्तर

नवी दिल्ली : भारत कधीच मुस्लिम विरहीत देश होणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. या विधेयकावरील चर्चेदरम्यान समाजवादी पार्टीचे सदस्य जावेद अली खान यांनी या विधेयकामुळे देश मुस्लिमविरहीत होण्याची भीती व्यक्‍त केली होती. त्यांची ही भीती अनाठायी असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. “तुम्हाला स्वतःला जरी वाटले तरी देश मुस्लिम विरहीत होणार नाही.’ असे शहा म्हणाले.

या विधेयकामुळे देशातील मुस्लिमांचे नागरिकत्व रद्द होणार नाही. त्यामुळे मुस्लिमांने घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे सांगून कॉंग्रेसच्या कपिल सिब्बल यांच्या आक्षेपांनाही शहा यांनी उत्तर दिले. हे विधेयक नागरिकत्व बहाल करण्यासाठी आहे, नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही. या विधेयकात कोणत्याही मुस्लिमाचे नागरिकत्व रद्द करण्याचे तरतूदच नाही. मग हे विधेयक “मुस्लिम विरोधी’ कसे असू शकेल. देशाची “फाळणी’ या ऐतिहासिक घोडचूकीची दुरुस्ती करण्यासाठी आणि पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील बिगर मुस्लिमांन मानाचे जीवन जगता यावे, यासाठीच हे विधेयक आहे, असे शहा म्हणाले.

फाळणी आणि अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्यास पाकिस्तानला आलेले अपयश यामुळेच हे विधेयक मांडावे लागते आहे. फाळणी धर्माच्या आधारावरच केली गेली होती. त्या घोडचुकीमुळेच आज हे विधेयक सादर करण्याची वेळ आली आहे. फाळणीमुळे अल्पसंख्यांकांचे प्रश्‍न निर्माण झाले नसते, तर आज हे विधेयक मांडण्याची गरजच नसती. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार केवळ राज्य करण्यासाठी नसून चुकांची दुरुस्ती करण्यासाठीही काम करत आहे, असेही शहा म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.