भारतीय सेना दिन

पंधरा ऑगस्ट 1947 यादिवशी भारत स्वतंत्र झाला. मात्र, फाळणी, दंगली, भारताकडे येणारे शरणार्थी यांमुळे भारतभर गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे अनेक प्रशासकीय समस्या निर्माण झाल्या. मग देशातील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय सेना पुढे आली. त्यावेळी भारतीय सेनेचे अध्यक्ष अद्याप ब्रिटिशच होते. त्यानंतर 15 जानेवारी 1949 या दिवशी फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेनाप्रमुख बनले. त्यावेळी भारतीय सेनेत साधारण दोन लाख सैनिक होते. तेव्हापासून प्रत्येक वर्षी पंधरा जानेवारी हा भारतीय सेनादिन मानला जातो. आपला देश व देशवासियांसाठी ज्या पराक्रमी सैनिकांनी आपले सर्वस्व अर्पण केले, त्यांना या दिवशी मानवंदना दिली जाते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. खरं तर आपण जन्मभर प्रत्येक दिवशी या सैनिकांबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे.

घरापासून दूर, कायम विपरीत निसर्गात, आजूबाजूला सतत शत्रूसैन्याच्या कारवाया आणि मृत्यूची टांगती तलवार असताना सैनिक कसा काम करत असेल! सामाजिक जीवनात काम करताना काही चुकलं तर सुधारायला वेळ असतो. अशी संधी लष्करात नसते. नो रीटेक! जे काही असेल ते लगेच ठरते. तुम्ही आहात किंवा नाही आहात. म्हणूनच ले. क. धरमदत्त गोएल एक पाऊल पुढे गेले आणि जमिनीवर आदळले. स्वतःचाच पाय बुटासकट उंच उडालेला त्यांनी पाहिला. पण हे सैनिक कुठल्या मातीचे बनलेले असतात कळत नाही. त्यानंतर काहीच दिवसात ले. क. डी. डी. कृत्रिम पाय लावून पुन्हा ड्युटीवर हजर झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या मित्राच्या लग्नाच्या पार्टीत उत्कृष्ट टॅप डान्सही केला.

माझं मनोरंजन, सुरक्षितता, ऐषोराम हा माझा हक्कच आहे असं आपण समजत असतो. माझं कर्तव्य आणि माझं समर्पण फक्त माझ्या कुटुंबापुरतंच मर्यादित आहे असं आपल्याला वाटतं. ह्या विचारानंच आपण आयुष्यभर मार्गक्रमण करीत असतो. सैनिकांच्या मनावर मात्र कायम हेच ठसवलं जातं… किंबहुना शपथ घेतली जाते.

प्रथम प्राधान्य ः देशाची सुरक्षितता, सन्मान आणि हित, त्यानंतर सहकाऱ्यांची सुरक्षितता आणि हित आणि सर्वात शेवटी स्वतःची सुरक्षितता आणि हित कधी आपले नागरिक पर्यटनाला जातात. अचानक हवा बिघडते. बर्फ, वादळं, मिट्ट काळोख… अशा स्थितीत हे जवान हेलिकॉप्टर घेऊन जातात आणि त्यांना अलगद घेऊन येतात. अशा अंधारात ते जेव्हा जातात, तेव्हा कधी अपघात होतात; कधी या सैनिकाचा मृत्यू होतो. मग त्यांच्या घरी हा सैनिक हुतात्मा झाल्याची बातमी जाते. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना वाचवण्यासाठी हे मौल्यवान हिरे आपले प्राण पणाला लावतात. वातावरण, सुखसोयी सगळं ठीकठाक असतानाही आपण बाहेर गेलेल्या आपल्या माणसाची काळजी करत बसतो. मिलिटरीमध्ये मात्र, “नो न्यूज ईज गुड न्यूज’ असंच मानलं जातं. कारण त्यांच्याकडे बातमी येते ती, तो जवान हुतात्मा होतो तेव्हाच! या जवानांचे आई-वडील, पत्नी, मुलं, भावंडं यांना आपलं मनोधैर्य टिकवून ठेवताना किती सायास पडत असतील! घरातून बाहेर पडताना आपली माणसं सहजच म्हणतात, “येतो संध्याकाळी…’ पण हे जवान जेव्हा ड्युटीवर जातात, तेव्हा ते मनात म्हणत असतात, “कुणास ठाऊक, परत येऊ की नाही…’

गैरसोयी असलेल्या ठिकाणी नंदनवन निर्माण करणं, अधिकारी आहे म्हणून निव्वळ अधिकार न गाजवता जबाबदारीनं आणि प्रेमानं बरोबरच्या सैनिकांना सांभाळणं, अत्यंत कठीण परिस्थितीत हताश न होता अगदी सहजगत्या त्यावर मात करणं, प्रत्येक क्षण उत्फुल्लतेनं जगणं आणि मरणाबद्दलही तितकंच सख्य बाळगणं… सगळंच मनमोहक आणि अचंबित करून टाकणारं. बर्फातील उणे पन्नास डिग्री तपमान असो की वाळवंटातील पन्नास डिग्री तपमान. विनातक्रार डोळ्यात तेल घालून सीमेच्या रक्षणासाठी सतत सावध आणि दक्ष राहून उभं तर राहावंच लागतं. कित्येकदा घनदाट जंगलात लपलेल्या अतिरेक्‍यांचा बिमोड करण्यासाठी त्यांना जंगलाच्या दारात हेलिकॉप्टरनी उतरवावं लागतं. जणू त्यांना मृत्यूच्या दारातच सोडलं जातं. तिही माणसंच आहेत. आत घुसण्याआधी आई-वडील, पत्नी, मुलं यांच्या आठवणींनी ते व्याकुळ होत असतात. पण क्षणार्धात स्वतःच्या साऱ्या भावना बाजूला सारून ते वरिष्ठांना “यस्सर!’ म्हणून सलाम ठोकतात आणि जीवावर उदार होऊन ते शत्रूचा माग काढण्याच्या कामाला लागतात.

खरं तर संरक्षणदलातील प्रत्येकाला त्याचा यथोचित सन्मान मिळायला हवा. येथे नतमस्तकच व्हायला हवं. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचाच जयजयकार व्हायला हवा! तुरुंगाच्या वाऱ्या करणाऱ्या नटांचा नव्हे! चाहत्यांचा गराडा तर ह्या खऱ्या हिरोंभोवती पडायला हवा. या सैनिकांचा त्याग स्मरून जातपात, धर्मपंथ, राजकीय पक्ष… या भिंती उभारण्यास आपण नकार द्यायला हवा. या भिंतींनी भारतीय समाजाची विभागणी करण्यापेक्षा भारतीयत्वाचा एकच झेंडा आपण हातात घेतला; तर या देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सैनिकांना खरीखुरी श्रद्धांजली आणि ठामपणे सीमेवर उभे राहणाऱ्या सैनिकाला खरीखुरी मानवंदना दिल्यासारखे होईल. भारतीय सेनादिनी आपण इतके तरी ठरवायलाच हवे!

माधुरी तळवलकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here