भारतीय महिला हॉकी संघाचे रौप्यपदकावर समाधान

जकार्ता: इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांपाठोपाठ भारतीय महिला संघाचंही सुवर्णपदकाचं स्वप्न संपुष्टात आलं आहे. अंतिम फेरीत जपानने भारतीय महिलांचा 2-1 ने पराभव करत सुवर्णपदक पटकावताना भारतीय महिलांचा पराभव केला. या विजयासह जपानच्या महिलांनी 2020 साली आपल्याच देशात होणाऱ्या टोकिया ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे. तिसऱ्या सत्रात जपानने पेनल्टी कॉर्नरवर केलेला गोल हा निर्णयाक ठरला. या पराभवासह भारतीय महिलांना रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.

जपानने पहिल्या मिनीटापासून आक्रमक खेळ करायला सुरुवात केली. अवघ्या दोन मिनीटाच्या खेळांमध्ये जपान संघाच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंनी भारतीय गोलपोस्टवर दोन हल्ले चढवले. मात्र गोलकिपर सविता आणि कर्णधार राणी रामपाल यांनी भारताचा गोलपोस्ट शाबूत ठेवला. मध्यंतरीच्या काळात भारतीय खेळाडूंनी जपानचं आक्रमक भेदण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कर्णधार राणी रामपालने सुरेख पद्धतीने जपानच्या खेळाडूकडे असलेला बॉल हिसकावत बचाव भेदला, मात्र जपानच्या गोलकिपरने मोठ्या शिताफीने भारताचं हे आक्रमण परतावून लावलं. यादरम्यान भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची एक संधीही आली, मात्र त्यावर गोल करणं भारतीय महिलांना जमलं नाही. जपानच्या संघाने मात्र आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत 11 व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिल्या सत्रात आघाडी घेतल्यामुळे जपानच्या खेळाडूंमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास जाणवत होता. दुसऱ्या सत्रात सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये भारतीय महिला दिशाहीन हॉकी खेळत होत्या. अनेकदा पास हे चुकीच्या दिशेने जाताना पहायला मिळाले. मात्र राणी रामपालने पुन्हा एकदा आपला अनुभव पणाला लावत जपानी खेळाडूकडून बॉलचा ताबा आपल्याकडे घेतला. राणी रामपालने बॉल नवनीत कौरकडे पास देत जपानच्या डी-एरियात प्रवेश केला. नवनीतनेही संधी पाहून केलेल्या पासवर 25 व्या मिनीटाला नेहा गोयलने बॉलला गोलपोस्टची दिशा दाखवत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. या गोलच्या जोरावर भारताने मध्यांतरापर्यंत सामन्यात बरोबरीही साधली.

सामन्यात बरोबरी साधल्यानंतर भारतीय महिलांनी तिसऱ्या सत्रात आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. वंदना कटारिया, नवनीत कौर, राणी रामपाल यांनी चांगल्या चाली रचून जपानच्या खेळाडूंवर दबाव टाकला. मात्र प्रयत्नांची पराकाष्टा करुनही जपानचा बचाव भेदणं भारतीय महिलांना जमलं नाही. सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये भारतीय महिलांनी केलेल्या आक्रमक खेळामुळे जपानच्या महिलाही चांगल्या भांबावून गेल्या. मात्र वेळेतच स्वतःला सावरत जपानने भारतावर हल्ले करायला सुरुवात केली. 44 व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करुन जपानने तिसऱ्या सत्राच्या अखेरीस सामन्यात पुन्हा एकदा 2-1 अशी आघाडी घेतली. चौथ्या सत्रात भारतीय महिलांनी गोल करण्याचे अतोनात प्रयत्न केले, मात्र यामध्ये त्यांना यश आलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)