भारतीय महिला संघाचा श्रीलंकेला “व्हाईट वॉश’

पाचव्या टी-20 सामन्यातही एकतर्फी विजय

गाटुमी: जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांची शानदार फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजांचा प्रभावी मारा यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने पाचव्या टी-20 क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाचा 51 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे भारतीय महिला संघाने पाच सामन्यांची ही मालिका 4-0 अशी जिंकली आहे. मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चौथ्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारल्यावर श्रीलंकेच्या महिला संघाला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आज पुन्हा एकदा नाणेफेक जिंकल्यावर श्रीलंकेच्या महिला संघाने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला व भारतीय महिलांचा डाव 18.3 षटकांत 156 धावांवर रोखला. परंतु त्यामुळे निकालात फारसा फरक पडला नाही. काल सात गडी राखून विजय मिळविणाऱ्या भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा डाव 17.4 षटकांत सर्वबाद 105 धावांत गुंडाळून आज 51 धावांनी बाजी मारली.

श्रीलंकेच्या महिला संघाकडून संजीवनी (29), सिरिवर्धने (22) व रणसिंघे (22) या तिघी वगळता बाकी खेळाडूंनी निराशा केली. चार बाद 89 धावांवरून श्रीलंकेच्या अखेरच्या सहा फलंदाज 16 धावांत तंबूत परतल्या व त्यांचा डाव 105 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून पूनम यादवने 18 धावांत 3, राधा यादवने 14 धावांत 2, तर दीप्ती शर्माने 18 धावांत 2 बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.

नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाची स्मृती मंधाना आणि मिताली राज ही सलामीची जोडी सलग तिसऱ्या सामन्यांत अपयशी ठरली. या वेळी मितालीने 12 धावा केल्या, तर स्मृती मंधानाला भोपळाही फोडता आला नाही. दोन बाद 30 अशा अवस्थेतून जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी केवळ 7 षटकांत 75 धावांची झंझावाती भागीदारी उभारून भारतीय महिला संघाचा डाव सावरला. अखेर सिरिवर्धनेने जेमिमाला बाद करून ही जोडी फोडली.

जेमिमाने केवळ 31 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 46 धावा फटकावल्या. जेमिमाचे सलग तिसरे अर्धशतक मात्र केवळ 4 धावांनी हुकले. त्यानंतर वेदा कृष्णमूर्ती (8), अनुजा पाटील (1), तानिया भाटिया (5), अरुंधती रेड्डी (2), दीप्ती शर्मा (2), राधा यादव (1) व पूनम यादव (नाबाद 1) या भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केली. हरमनप्रीतने 38 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकारांसह 63 धावांची कर्णधाराला साजेशी खेळी केल्यामुळेच भारतीय महिलांना 156 धावांची मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक-
भारतीय महिला संघ- 18.3 षटकांत सर्वबाद 156 (हरमनप्रीत कौर 63, जेमिमा रॉड्रिग्ज 46, सिरिवर्धने 19-3, प्रियदर्शिनी 24-3) वि.वि. श्रीलंका महिला संघ- 17.4 षटकांत सर्वबाद 105 (संजीवनी 29, सिरिवर्धने 22, रणसिंघे 22, पूनम यादव 18-3, राधा यादव 14-2, दीप्ती शर्मा 18-2).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)