भारताला बरोबरीत रोखणे अभिमानास्पद – असगर अफगाण 

अफगाणिस्तान संघातील सहकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल अभिमान 
दुबई: भारतीय संघ दर्जेदार आहेच. शिवाय हा संघ स्पर्धेत अद्याप अपराजित आहे. अशा संघाला बरोबरीत रोखणे ही माझ्यासाठी आणि माझ्या संघासाठी अभिमानाची बाब आहे, असे उद्‌गार अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगाण याने काढले आहेत. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर फेरीतील भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना “टाय’ झाल्यानंतर तो बोलत होता.
रवींद्र जडेजाने शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीने लढण्याचा प्रयत्न केला, पण अवघा एक चेंडू शिल्लक असताना तो झेलबाद झाला आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले. कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या भारतीय संघाला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले आणि स्पर्धेचा शेवट गोड केला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत भारताविरुद्ध दिलेली झुंज अभिमानास्पद असल्याची भावना असगरने व्यक्‍त केली.
त्याचबरोबर रशीद खान आणि मुजीब उर रेहमान यांच्या गोलंदाजीची स्तुती करताना तो म्हणाला की, त्या दोघांनी मोक्‍याच्या क्षणी भारतीय फलंदाजांवर दडपण वाढवण्याचे काम चोख बजावले. तसेच अत्यंत अचूक गोलंदाजी करताना त्यांनी भारतीय फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले. त्यामुळे अखेरच्या क्षणी आम्हाला सामन्यात पुनरागमन करता आले. अर्थात डोके शांत ठेवून हे षटक टाकल्याबद्दल रशीदचेही कौतुक करायला हवे.
आशिया चषक स्पर्धेत आम्ही उत्तम खेळ केला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत आम्ही पोहोचू शकलो नाही. पण आज स्पर्धेचा ज्या पद्धतीने आमच्यासाठी शेवट झाला, ते पाहून माझा ऊर अभिमानाने भरून आला आहे. हा सामना, ही स्पर्धा हे सारे ऐतिहासिक आहे, कारण या पूर्वी आम्ही अशा पद्धतीचे क्रिकेट कधीही खेळलो नाही, असेही असगरने नमूद केले.
सलामीवीर फलंदाज मोहम्मद शहजादच्या धडाकेबाज खेळीचेही असगरने कौतुक केले. या खेळीचे वर्णन करताना तो म्हणाला की, शहजादने आमचे व्हान कायम राखले. आमच्या इतर फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरणे अवघड जात असताना त्याने भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करताना सहकाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यामुळेच आम्ही अखेरपर्यंत टिकून राहू शकलो.
विजयासाठी 253 धावांचे आव्हान पार करताना रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात मोक्‍याच्या क्षणी चौकार लगावला. पण विजयी फटका मारताना तो बाद झाला आणि भारताचे सर्व गडी तंबूत परतले. आयपीएलमध्ये आपली छाप उमटवणाऱ्या रशीद खानने दडपणाच्या क्षणी उत्तम गोलंदाजी करत अफगाणिस्तानला मानसिक विजय मिळवून दिला. शतकी खेळी करणाऱ्या मोहम्मद शहजादला सामनावीर घोषित करण्यात आले.
भारतीय संघाने हा सामना कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला. रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चाहल यांना आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्या जागी लोकेश राहुल, दीपक चाहर, मनीष पांडे, खलील अहमद आणि सिद्धार्थ कौल यांना संधी देण्यात आली. दीपक चाहरने आज एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
पंचांच्या निर्णयांवर धोनीची टीका
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान या क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पंचांच्या काही चुकीच्या निर्णयांना सामोरे जावे लागले. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने याची दखल घेत पंचांचा नामोल्लेख न करता नाराजी व्यक्‍त केली. “आपल्याला काही गोष्टींवर लक्षपूर्वक काम करण्याची गरज आहे, पण काही गोष्टी अशा आहेत की त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. कारण मला दंड भरण्याची इच्छा नाही’, अशी मिश्‍किल प्रतिक्रिया धोनीने दिली. या सामन्यात धोनी आणि दिनेश कार्तिक पायचीत झाल्याचा निर्णय पंचांनी दिला होता. मात्र, रीप्लेमध्ये पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले होते. भारतीय संघाकडे रिव्ह्यूची संधी नसल्याने संघाला पंचांच्या खराब निर्णयांचे बळी ठरावे लागले. याशिवाय, सामन्याच्या शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने लगावलेला फटका षटकार असतानाही सामन्याच्या तिसऱ्या पंचांनी तो चौकार असल्याचा निर्णय दिला होता. अखेर टीम इंडियाचा विजय अवघ्या एका धावेने हुकला आणि सामना बरोबरीत सुटला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)