भारतात घसरतोय महिलांचा श्रमिकदर…

प्रा. शुभांगी कुलकर्णी 

भारतातील निम्मी लोकसंख्या म्हणजे सुमारे 60 कोटी लोकसंख्या महिलांची आहे. ही महिला प्रशिक्षित आणि शिक्षित आहे. असे असतानाही महिलांचा श्रमातील सहभाग कमी होत आहे. कौटुंबिक परिस्थिती कशीही असली तरी महिला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सक्षम असते. एकाचवेळी अनेक जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांना आपली ओळख तयार करताना त्यांच्यावर तडजोड करण्याची वेळ येऊ नये, याचे भान समाजाने बाळगणे गरजेचे होऊन बसले आहे.

भारतात 60 टक्‍के संख्या महिलांची आहे. हा महिलावर्ग कार्यक्षम आहे. असे असतानाही महिलांच्या श्रमिकदरात गेल्या काही वर्षांपासून घट होत आहे. आई होण्याची जबाबदारी आणि विभक्‍त कुटुंबांची वाढती संख्या यामुळे श्रमिकदरावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. आजघडीला सर्वच क्षेत्रांत महिला, मुलगी, युवती आघाडी घेत असताना करियरच्या आघाडीवर मात्र पिछाडीवर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सामाजिक रुढी, परंपरा यांचा जोखड झुगारून पुढे जाणाऱ्या महिला कुटुंबाच्या आघाडीवर अधिक भावनिक होतात. आई, मुलगी, पत्नी, बहीण अशी भूमिका पार पाडणाऱ्या स्त्रीला आपल्या क्षमतेनुसार पुढे जाण्याची संधी मिळणे आवश्‍यक आहे; पण तसे होताना दिसत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील 72 टक्‍के महिला या आई झाल्यावर नोकरी सोडून देत असल्याचे आढळून आले आहे. देशात स्पर्धात्मक परीक्षेपासून ते शाळेतील निकालापर्यंत मुली आघाडी घेत असताना सर्वेक्षणातून मात्र केवळ 15 टक्‍केच महिला निवृत्तीपर्यंत पोहोचत असल्याचे निदर्शनास आले आहे. आई झाल्यानंतर केवळ 27 टक्‍केच महिला आपली नोकरी टिकवण्यात यशस्वी ठरतात. 50 टक्‍के महिला मातृत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी नोकरीवर पाणी सोडत असल्याचे चित्र आहे.

उच्च शिक्षणात मुलींचे वाढते आकडे आणि लष्करापासून ते अंतराळ उड्डाणापर्यंत वेगाने वाढणारी महिलांची भागीदारी पाहता अशा प्रकारचे आकडे चिंताजनक मानले जात आहेत. एवढेच नाही तर या सर्वेक्षणात कामाच्या ठिकाणी महिला आणि पुरुष यांच्यात भेदभाव असल्याची बाबही प्रकर्षाने जाणवली आहे. याशिवाय अन्य कारणांनी देखील महिलांच्या श्रमशक्‍तीत घट होताना दिसून येत आहे. मातृत्व, कौटुंबिक जबाबदारीबरोबरच सामाजिक असुरक्षिततेची भावना या कारणामुळे देखील नोकरी सोडण्याचे किंवा काम सोडण्याचे प्रमाण वाढले आहे.

देशातील महिलांची क्रयशक्‍तीतील भागीदारी आणि भेदभावावरून समोर आलेले आकडे हे विचार करण्यास भाग पाडणारे आहेत. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना महिला स्वत:चे अस्तित्व गमावत असल्याचे दिसून येते. अनंत अडचणींवर मात करून शैक्षणिक गुणवत्ता मिळवलेल्या देशातील निम्म्या महिला या कालांतराने आपले करियर विसरून कौटुंबिक जबाबदारी पार पाडतात.

गेल्या वर्षी जागतिक बॅंकेच्या इंडिया डेव्हलपमेंट अहवालात म्हटले होते की, कामाच्या ठिकाणी महिलांच्या सहभागाच्या आघाडीवर आजही भारत बराच मागे आहे. 131 देशांच्या यादीत भारत 120 व्या स्थानावर आहे. जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार भारताच्या क्रयशक्‍तीत महिलांची आकडेवारी वाढल्यास आर्थिक विकासदर हा 10 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचू शकतो. द इकॉनॉमिस्टच्या मते, भारत जर महिलांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करत असेल तर 2025 पर्यंत जीडीपीत 18 टक्‍के वाढ करू शकतो.

समाजातील मोठा घटक असणारा महिलावर्ग हा क्षमता आणि पात्रता राखून असून नोकरीत लैंगिक भेदभाव, सामाजिक जबाबदारी, कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता आणि बढती मिळवतानाची द्विधा मनःस्थिती, कौटुंबिक असहकार्य या कारणामुळे करियरला मागे सोडत असल्याचे दिसून येते. उच्च शिक्षण असतानाही सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती ही आई झाल्यानंतर करियर सुरू ठेवायचे की नाही, हे निश्‍चित करते. मुलांचा सांभाळ आणि नोकरी याचा ताळमेळ राखताना कुटुंबाचे पाठबळ असणे गरजेचे असते. अशा प्रकारचे पाठबळ सर्वसाधारणपणे मिळत नाही. एवढेच नाही तर असुरक्षितता आणि पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने महिला नोकरी करू शकत नाहीत. आजही मोठमोठ्या कंपनीत मुलांसाठी वेगळी व्यवस्था केलेली दिसत नाही. अशा स्थितीत महिला आपल्या पाल्यांना नोकरांच्या जीवावर सोडून येण्यास धजावत नाहीत. त्यापेक्षा नोकरी सोडलेली बरी, असा विचार त्या करतात.

आजही मुलांचा सांभाळ करण्याची प्राथमिक जबाबदारी ही आईवर, महिलेवरच असते. त्या जोरावरच मुली अभ्यासात आघाडीवर राहतात. मात्र करियरच्या शर्यतीत त्याचे प्रमाण कमी होत जाते. आजही आई-वडिलांचे प्राधान्य हे मुलीचा विवाह करून देणे आणि कुटुंबाला पुढे नेणे या गोष्टीलाच असते. अशा स्थितीत लग्न आणि मातृत्व यासी निगडीत अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत की त्याठिकाणी महिलांना तडजोड करावी लागते. आई झाल्यानंतर बहुतांश महिला रोजगाराशी नाते तोडतात. तसेच काही महिला आई झाल्यानंतर कामातून काही काळ ब्रेक घेतात. त्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करताना त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. असे असतानाही प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांना मागे टाकत आहेत. तांत्रिक आणि उच्च शिक्षणात महिलांचे यशस्वितेचे प्रमाण खूपच वाढले आहे. 2011 च्या लोकसंख्येचे विश्‍लेषणातील आकडे सांगतात की, 2001 ते 2011 दरम्यान देशात महिलांचा शिक्षणाचा स्तर हा 116 टक्के वाढला आहे. दुर्दैवाने शैक्षणिक क्षेत्रात यशाचे शिखर गाठणाऱ्या मुलींवर कालांतराने जेव्हा करियर करण्याची वेळ येते तेव्हा कुटुंबाचे अपेक्षित सहकार्य मिळताना दिसून येत नाही.

समाजात असलेले भेदभावात्मक विचार आणि व्यवस्थेतील उणिवा याचा समर्थपणे मुकाबला करणाऱ्या महिलांना आपल्याच कुटुंबाकडून सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येते. कामकाजावरून आजही परंपरागत रुढी आणि आचारविचारांनी महिला बांधलेल्या असतात. आरती सहयोग आणि विकास संघटनेच्या 2012 मधील एका अहवालानुसार भारतात पुरुष मंडळी घरगुती कामात अधिक मदत करत नसल्याचे दिसून येते. एखाद्या कुटुंबात पुरुषाच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षा अधिक कमावती महिला असली तरी पुरुषसत्ताक प्रथेमुळे महिलेला अनेक प्रकारच्या मानसिक छळाला सामोरे जावे लागते. भारतातील निम्मी लोकसंख्या सुमारे 60 कोटी लोकसंख्या महिलांची आहे. ही महिला प्रशिक्षित आणि शिक्षित आहे. असे असतानाही महिलांचा श्रमातील सहभाग कमी होत आहे. कौटुंबिक परिस्थिती कशीही असली तरी महिला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सक्षम असते. एकाचवेळी अनेक जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांना आपली ओळख तयार करताना त्यांच्यावर तडजोड करण्याची वेळ येऊ नये, याचे भान समाजाने बाळगणे गरजेचे होऊन बसले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)