भारताच्या पुरुष व महिला संघांची विजयी सलामी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा

बाटुमी: भारताच्या पुरुष व महिला संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना येथे सुरू झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत विजयी सलामी दिली. माजी विश्‍वविजेता विश्‍वनाथन आनंद आणि माजी जगज्जेती कोनेरू हंपी हे अव्वल खेळाडू पहिल्यांदाच या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

महिला गटातील पहिल्या लढतीत भारतीय महिला संघाने न्यूझीलंडचा 4-0 अशा फरकाने धुव्वा उडविला. मात्र भारतीय पुरुष संघाला एल साल्व्हादोरविरुद्ध अर्धा गुण गमावून मगच विजय मिळविता आला. दुसऱ्या फेरीच्या लढतीत भारतीय महिला संघासमोर व्हेनेझुएलाचे आव्हान आहे. या लढतीतही भारतीय महिला संघ एकतर्फी विजय मिळविण्याची चिन्हे आहेत. भारतीय पुरुष संघाला दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रियाशी झुंज द्यावी लागेल. ऑस्ट्रियाच्या संघात अनेक ग्रॅंडमास्टर असल्याने हे आव्हान भारताला सोपे जाणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्यूझीलंड संघाविरुद्ध कर्णधार कोनेरू हंपीने हेलेन मिलिगनवर मात करून विजयी सलामी दिल्यावर तानिया सचदेवने विआनला पुन्सेलनचे आव्हान मोडून काढत भारतीय महिलांना 2-0 आघाडीवर नेले. ईशा करवडेने जसमीर हावमावचा एकतर्फी लढतीत धुव्वा उडविल्यावर पद्मिनी राऊतने क्‍विन निकोल शू हिला पराभूत करून भारताच्या विजयाची पूर्तता केली.

पुरुष गटांत आज आनंदला विश्रांती देण्यात आली. परंतु कार्लोस बरगॉसने कृष्णन शशिकिरणला बरोबरीत रोखल्याचा अपवाद वगळता हरिकृष्णाने जॉर्ज गिरॉनला, विदित गुजराथीने रिकार्डो चावेझला आणि बी. अधिबनने डॅनियल एरियासला पराभूत करीत भारतीय पुरुष संघाला विजयी सलामी दिली. या स्पर्धेतील आजच्या दिवसांत एकही लढत बरोबरीत सुटली नाही आणि हा ऐतिहासिक विक्रम ठरला.

विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या अमेरिका आणि रशियन संघांनी 4-0 अशा विजयाची नोंद केली. मात्र तृतीय मानांकित चीनला 3-1 अशा विजयावर समाधान मानावे लागले. पुरुष गटांत सहभागी झालेल्या 184 पैकी 64 संघांनी 4-0 असा विजय नोंदविला. तर 17 संघांनी अर्धा गुण गमावून विजयाची नोंद केली. महिला गटातही 151 सहभागी देशांपैकी 55 देशांनी 4-0 अशा विजयाची नोंद केली.
आजचे निकाल- पहिली फेरी-
महिला विभाग- भारतीय महिला संघ वि.वि. न्यूझीलंड महिला संघ 4-0 (हेलेन मिलिगन पराभूत वि. कोनेरू हंपी, तानिया सचदेव वि.वि. विआनला पुन्सेलन, जसमीर हावमाव पराभूत विरुद्ध ईशा करवडे, पद्मिनी राऊत वि.वि. क्‍विन निकोल शू),
पुरुष विभाग- भारतीय पुरुष संघ वि.वि. एल साल्वादोर संघ 3.5-0.5 (हरिकृष्णा वि.वि. जॉर्ज अर्नेस्टो गिरॉन, रिकार्डो चावेझ पराभूत वि. विदित गुजराथी, बी. अधिबन वि.वि. डॅनियल एरियास, कार्लोस बरगॉस बरोबरी वि. कृष्णन शशिकिरण.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)