भारतरत्नाचे राजकारण?

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, भारतीय जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारीका यांचा समावेश आहे. यांनी देशासाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. यात दुमत नाही मात्र भाजप सरकारने भारतरत्न पुरस्काराचे राजकारण केल्याची जोरदार चर्चा सध्या होत आहे.

भारतरत्न पुरस्काराची सुरवात भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी 2 जानेवारी 1954 ला केली. सुरूवातीला हा पुरस्कार केवळ जीवंत असलेल्या व्यक्तींनाच देण्यात यावा, अशी तरतूद होती पण जानेवारी 1955 मधे त्यात सुधारणा घडवण्यात आली. यानंतर हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यास सुरूवात झाली. भारतरत्न हा भारतातील एक सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ज्या व्यक्तीने देशातील मानवतेसाठी, समाजासाठी उच्चकोटीची तसेच भरगच्च कामगिरी केली आहे. त्यांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो. सुरूवातीला हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेल्या व्यक्तींना दिला जात असे. कालांतराने भारतरत्न या पुरस्काराच्या कक्षा रुंदावून कोणत्याही क्षेत्रात विलक्षण कामगिरी केलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. एवढेच नाहीतर केवळ भारतीयांसाठी काम केलेल्या अथवा केवळ भारतीय व्यक्तीपर्यंतच हा पुरस्कार मर्यादित न ठेवता जगामधील कुठल्याही व्यक्तीने मानवतेसाठी दिलेल्या योगदानाची पोहोचपावती म्हणून भारतरत्न दिला जाऊ लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजप सरकारने जाहीर केलेल्या नावांमध्ये नानाजी देशमुख आणि संगीतकार भूपेन हजारीका हे सोडून कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि पक्के कॉंग्रेसवादी ज्यांना पंतप्रधान बनण्यापासून नेहमी डावलण्यात आलं, असे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भाजपच्या शेवटच्या टर्ममध्ये भारतरत्न मिळाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने प्रणव मुखर्जी यांच्या माध्यमातून बंगाली कार्ड खेळल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. ज्या विचारांचे सरकार आहे त्याच विचारांच्या व्यक्तींना पुरस्कार देणे, हे नवीन नाही आहे. मात्र यावर्षी देण्यात आलेले पुरस्कार भाजपने मोठे राजकीय विचार करून जाहीर केले आहेत.

एकीकडे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक वि.दा. सावरकर आणि पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यामध्ये 1848 साली मुलींची शाळा सुरु करणारे, तत्कालिन सामाजिक व्यवस्थेला झुगारुन क्रांतीकारक पाऊल उचलणारे, ज्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा पाय घातला असे, थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब द्यावा ! अशी मागणी वर्षानुवर्षे होत आहे. मात्र याकडे नेहमी कानाडोळा करण्यात आला. कारण पुरस्कार देणारे पक्के राजकारणी! अनेक नेत्यांनी, सामाजिक संघटनेने यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. नियम 377 अंतर्गत देखील लोकसभेत मागणी झाली. मात्र हे सर्व निष्फळ !

कॉंग्रेस सरकार असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिलेलं मरणोत्तर भारतरत्न काढून घेतलं गेले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण कामगिरी कोणीच नाकारू शकत नाही पण केवळ त्यांच्या मृत्युचं सर्टीफिकीट नाही म्हणून त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाता कामा नये असे म्हणून दिलेला पुरस्कार नाकारण्यात आला होता. भारतरत्न पुरस्कराचे राजकारण आताच होतेय असे नाही. मात्र सरकार कोणाचेही असो भारतरत्न सारख्या सर्वोच्च पुरस्काराला आता महत्व नाही, हे स्पष्ट होते.

– संदीप कापडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)