भामा-आसखेड प्रकरण : येत्या 1 ऑक्‍टोबरला बोलविली बैठक

ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, महापालिकेची संयुक्त बैठक
बंद असलेले काम पुन्हा सुरू होण्याची चिन्हे
तिढा सोडविण्यासाठी सौरभ राव यांचा पुढाकार

पुणे: शहराच्या पूर्व भागाला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेडून सुरू असलेल्या भामा-आसखेड योजनेच्या जॅकवेलचे काम स्थानिक नागरिकांनी गेल्या 2 महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी बंद पाडले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत या प्रकल्पाचा खर्च तब्बल 60 ते 70 लाख रुपयांनी वाढला असून हा तिढा सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनीच पुढाकार घेतला आहे. येत्या 1 ऑक्‍टोबर रोजी राव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या विषयावर चर्चेसाठी ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेची संयुक्त बैठक बोलाविली आहे. त्यामुळे बंद असलेले हे काम पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्व पुण्यासाठी भामा-आसखेड धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी काम सुरू आहे. त्यात वाकीतर्फे वाडा या गावात जॅकवेल बांधण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी प्रकल्पग्रस्तांनी हे काम अडविल्याने ते बंद होते. त्याचा परिणाम प्रकल्पाच्या खर्चावर पडत असल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन 1700 मिमी व्यासाच्या जलवाहिनी तसेच जॅकवेलचे काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांनी मान्यता दिली होती. त्यानंतर पुन्हा दि.22 मार्च ते 21 एप्रिलदरम्यान आपल्या मागण्यांसाठी या जॅकवेलचे काम आंदोलकांनी बंद पाडले होते. त्यावर काम बंद पाडल्यास आंदोलकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, 2 जुलै पासून हे काम ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा बंद केले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने वारंवार पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती.

मात्र, आधी मराठा मोर्चाचे कारण देत महापालिकेस पोलीस बंदोबस्त नाकारण्यात आला, त्यानंतर 15 ऑगस्टच्या बंदोबस्ताचे कारण पालिकेस देण्यात आले. त्यानंतर बंदोबस्त मिळेल अशी शक्‍यता असतानाच; एका शेतकऱ्याकडून धरणात आत्महत्या करण्यात आली, त्यामुळे चिघळलेले वातावरण लक्षात घेऊन पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाने महापालिकेस काम थांबविण्याची विनंती केली. त्यानंतर पुन्हा गणेशोत्सवाचे कारण देत महापालिकेस जिल्हा प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त देण्यात आला नाही. त्यामुळे हे काम अद्यापही बंदच असून या कामासाठी पालिकेने निश्‍चित केलेली मुदत संपत आली असून प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे.

आयुक्तच उतरणार रिंगणात

आयुक्त राव हे जिल्हाधिकारी असताना, त्यांनी भामा आसखेड प्रकल्प काळजीपूर्वक हाताळला होता. त्यामुळे जवळपास एक वर्ष बंद असलेले काम केवळ आयुक्त राव यांच्यामुळे पोलीस बंदोबस्तात करणे शक्‍य झाले होते. त्यानंतर राव यांच्याकडे सहा महिन्यांपूर्वी पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी आली, तर जिल्हाधिकारीपदी नवल किशोर राम यांची नियुक्ती झाली. त्यांच्याकडूनही या प्रकरणी ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, ग्रामस्थ ऐकण्याच्या तयारीत नसल्याने तसेच त्यांनी जलसमाधी घेण्याची धमकी दिल्याने या प्रकरणी विभागीय आयुक्तांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही काहीच होऊ न शकल्याने आता आयुक्त राव यांनी स्वत: या प्रकरणी ग्रामस्थांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)