भामा आसखेड धरनातून भीमा नदीत पाणी सोडले

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

देउळगावराजे- भामा आसखेड धरनातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले असून पाच-सहा दिवसांत दौंड तालुक्‍यातील शेवटचा बंधारा पेडगाव (ता. दौंड) येथे पोहचणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

4 मार्च रोजी भामा आसखेड धरनातून आलेगाव पागापर्यंतचे बंधारे भरून घेण्यासाठी 1100 क्‍युसेक पाणी सोडण्यात आले होते; परंतु भीमा नदीवरील दौंड तालुक्‍यातील कोल्हापूर पद्धतीचे पारगाव सा. मा. पासून पेडगावपर्यतचे सात बंधारे भरणे गरजेचे होते. उपसा सिंचन योजनेमुळे सगळ्या बंधाऱ्यांनी तळ गाठला होता. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आजपर्यंत धरनातून 800 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. आता ते पाणी पारगावच्या बंधाऱ्यापर्यंत येईपर्यत 300 क्‍युसेक होत आहे.
मुळा-मुठा वरील दहीटने, राहु बंधाऱ्यावरील गेट काढून दोन्ही तीरावरील वीजपुरवठा बंद करुन मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे खोरवडी बंधाऱ्यातून पाणी रविवारी सायंकाळपर्यंत देउळगाव बंधाऱ्याकडे जाईल, असा अंदाज आहे. मुंढवा लिफ्टने मुळा-मुठा नदीतून जुन्या कालव्यात सोडण्यात येणारे पाणी व पुरंदर उपसा सिंचन योजना पुढील चार-पाच दिवस बंद ठेवल्यास शेवटच्या पेडगाव बंधाऱ्यापर्यंत त्वरित पाणी जाईल; परंतु ती कार्यवाही पुणे महापालिका व जलसंपदा विभागाकडून करणे गरजेचे आहे. दौंड तालुक्‍यातील बंधाऱ्यात पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांमधे समाधानाचे वातावरण असून दुष्काळात चारा पीके आणि जनावरांच्या पाण्याची सोय झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.