भामाआसखेड धरण 72 टक्के भरले

शिंदे वासुली-शुक्रवारपासून खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात व धरण क्षेत्रात संततधार पाऊस झाल्याने भामाआसखेड धरण 72 टक्के भरले आहे. अशी माहिती भामा आसखेड जलसंपदा व धरण विभागाने दिली आहे. ही शेतकरीवर्ग, चाकण औद्योगिक विभाग व पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे.

आतापर्यंत धरणक्षेत्रात 809 मिमी पाऊस झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. समस्त शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला होता. पाऊस उशीरा झाल्याने शेतीतल्या पेरण्याही उशीरा झाल्या आणि मध्येच पाऊस गायब झाल्याने मराठवाडा, विदर्भासारखी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय? असे भीतीचे वातावरण पसरले; परंतु शुक्रवारपासून धोधो पाऊस पडू लागला आणि शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर हसू आले. भामा खोऱ्यात तर मुसळधार पावसाने हजेरी लावली. डोंगर दऱ्यांतून पाणी खळखळ वाहू लागले.

ओढ्यांना पूर आले. अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांची भात शेती पाण्याखाली गेली. सरासरी 74 मिमी पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी व विशेषतः पुणेकर समाधानी झाल्याचे पाहायला मिळाले. 8 टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेले भामा आसखेड धरणात आजमितीला 5.48 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण 71.45 टक्के भरले असून गतवर्षी यावेळेस 80.48 टक्के भरले होते. असाच पाऊस काही दिवस झाल्यास लवकरच धरण 100 टक्के पूर्ण क्षमतेने भरेल. त्यानंतर धरणातून नदीत विसर्ग सुरू करणार असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)