भात लावणीसाठी पोषक वातावरण

संततधार पावसामुळे शेतकरी समाधानी ः भातरोपे बहरली

चिंबळी-गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या संततधार मुसळधार पावसाने भात खाचरे भरली असून भात लावणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

चिंबळी, कुरूळी परिसरात मोई, निघोजे, केळगाव, मरकळ, सोळू, धानोरे, मोशी परिसरातील शेतकरी वर्गाने भात लावणीची लगबग सुरू झाली असून भाताची आवणी जवळजवळ अंतिम टप्प्यात आली आहे. कुरूळी भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहत आहेत. यामुळे शेती नावालाच शिल्लक राहिली असल्याची खंत व्यक्त होत असते; परंतु अद्यापही या भागातील काही हाडाच्या शेतकऱ्यांनी आपल्या मातीशी इमान राखत शेतीची जोपासना कायम ठेवली आहे. इतर खरीप पिकांबरोबरच भात लागवडही चिंबळी परिसरात मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यासाठी पेरणी पूर्व मशागतीत भात रोपांचे आवाण करून रोपे तयार करून घेतली होती. आता पाऊस समाधानकारक झाल्याने या आवाणमधील रोपे तयार करण्यात आलेल्या खाचरांमध्ये लावण्याची लगबग सुरू आहे. या आवणीसाठी मात्र मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई भासत आहे. कुशल मजूर नसल्याने भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा होत असून भात लागवडी खालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. यामुळे उरल्या सुरल्या शेतकऱ्यांना भात लागवडीसाठी परप्रांतीय मजुरांचा आधार घ्यावा लागत आहे.

लागवडीसाठी खर्च अधिक व त्या तुलनेने उत्पन्न कमी अशी अवस्था झाली असल्याचे शेतकरी सांगतात. प्रामुख्याने इंद्रायणी जातीच्या भाताची लागवड केली जात असून त्यापाठोपाठ आंबेमोहर, साधा गावरान तांदूळ, कोलम आदी जातीच्या बियाणांना प्राधान्य दिले जात आहे. असाच पाऊस चालू राहिल्यास भात लागवड शेतकऱ्यांच्या पथ्थ्यावर पडणार असून भरघोस पीक येण्याची अपेक्षा आहे. चिंबळी, कुरूळी पंचक्रोशीतील मरकळ, सोळू, चऱ्होली, चिखली, डुडुळगाव, वडमुखवाडी, मोई, निघोजे, मोशी आदी भागांमध्ये भात लागवड केली जाते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)