भाड्याच्या घरासाठी अनामत रक्कम हवीय?

काही शहरात घर भाड्याने घेण्यासाठी घरमालक मोठ्या प्रमाणात अनामत रक्कमेची मागणी करतात. ही रक्कम सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर ठरू शकते. मात्र एका स्टार्टअपने 12 शहरात अशा प्रकारची आर्थिक अडचण दूर करण्यास पुढाकार घेतला आहे. भाडेकरारावर नमूद केलेली अनामत रक्कम कर्जरुपी देण्याची सोय कंपनीने उपलब्ध करून दिली असून त्याबदल्यात भाडेकरुला व्याज भरावे लागते. भाडेकरार हा 11 महिन्याचा असो किंवा 33 महिन्यांचा असो त्यानुसार कर्जाचा कालावधी निश्‍चित केला जातो.

अनेक आयटी इंजिनिअरना पुणे, बंगळूर यासारख्या महानगरात नोकरीसाठी जावे लागते. आयटी इंजिनिअरचे वेतन लाखाच्या घरात असले तरी सर्वात मोठी समस्या म्हणजे राहण्याची सोय. काही महानगरात भाड्याबरोबरच अनामत रक्कमेची मागणी केली जाते आणि ती सर्वांनाच देणे शक्‍य होत नाही. नवरा-बायको कमावते असेल तर एखादेवेळी अनामत रक्कम देणे जमते, मात्र एकटाच मुलगा किंवा मुलगी असेल तर ही बाब अवघड जाते. एकीकडे नियमितपणे दर महिन्याचे भाडे आणि घरखर्चाची जबाबदारी असताना अतिरिक्त अनामत रक्कमेचा बोजा सर्वांनाच पेलवत नाही. तसेच अनेक आयटी इंजिनिअर एका शहरातून दुसऱ्या शहरात नवीन संधीच्या शोधात असतात. त्यामुळे त्यांना सिक्‍युरिटी डिपॉझिटसाठी पैशाची जमवाजमव करणे कठीण बाब ठरते.

या समस्येवर मार्ग काढण्यासाठी लोनटॅप नावाच्या एका स्टार्टअप कंपनीने मार्ग काढला. ही कंपनी रेंटल डिपॉझिट लोन देते. यानुसार एखादा घरमालक भाडे निश्‍चित करतो, तेव्हा लोनटॅप कंपनी रेंटल डिपॉझिट कर्जाच्या रुपाने भाडेकरूला सिक्‍युरिटी डिपॉझिट म्हणून निधी प्रदान करते. कर्जाची रक्कम एक ते पाच लाखापर्यंत असते. ही रक्कम 11 ते 33 महिन्यांसाठी दिली जाते आणि त्यानुसार भाडेकरार निश्‍चित केला जातो. यासंदर्भात लोनटॅपचे सहसंस्थापक सत्यम कुमार म्हणतात की, भाडेकरार संपेपर्यंत केवळ व्याज भरावे लागते.

भाडेकरूने घर सोडल्यानंतर घरमालक अनामत रक्कम परत देतो आणि ती रक्कम भाडेकरू लोनटॅप कंपनीला परत करतो. अशा प्रकारचे कर्ज मिळवण्यासाठी भाडेकरूला लोनटॅपच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज भरावा लागतो आणि काही कागदपत्रे जोडावी लागतात. कागदपत्राची तपासणी केल्यानंतर आणि कर्ज मंजूर झाल्यानंतर चोवीस तासात कर्जाची रक्कम दिली जाते. देशात 12 शहरात दरमहा तीस हजाराहून अधिक वेतन असणारा नोकरदार अशा कर्जासाठी पात्र ठरतो.

या शहरात सुविधा :अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, भोपाळ, दिल्ली एनसीआर, इंदूर, जयपूर, मुंबई, नवी मुंबई, पुणे, रायपूर, बडोदा आदी.

भाडेकरु आणि स्टार्ट-अपमध्ये करार : रेंटल डिपॉझिट लोनची रक्कम ही भाडेकरारपत्रात नमूद केलेल्या अनामत रक्कमेएवढी असते. या कर्जाचा करार हा भाडेकरू आणि कंपनीत होतो. रक्कम परत करण्याची जबाबदारी ही भाडेकरूंवर असते. यासंबंधी भाडेकरू एक लिगल ऍग्रीमेंट करतो. त्यानुसार तो कर्जरुपी उचललेली अनामत रक्कम ही परत करण्यास बांधील असतो. भाडेकरुला दरमहा अनामत रक्कमेच्या कर्जाचे व्याज कंपनीला भरावे लागते. करार संपल्यानंतर घरमालक जेव्हा रक्कम परत करेल, तेव्हा ती रक्कम भाडेकरू कंपनीकडे जमा करते आणि त्यानुसार भाडेकरु कर्जमुक्त होतो.

विनिता शाह 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)