भाजीमंडई समस्यांच्या गर्तेत!

  • अस्वच्छतेचे साम्राज्य: पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही

पिंपरी – शहरातील लाल बहाद्दूर शास्त्री भाजी मंडईसमोर झालेली अतिक्रमणे हाटवण्यासाठी मंडईतील गाळेधारकांनी अनेकदा आंदोलन, निवेदन दिली तरी महापालिक प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. एकीकडे अतिक्रमणामुळे हैराण झालेल्या गाळेधारकांना आता मंडई परिसरातील अस्वच्छतेमुळे मन:स्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी, मंडईमधील भाजी विक्रेते आणि खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांमध्येही नाराजीचा सूर आहे.

पिंपरी शहरातील लाल बहाद्दूर शास्त्री भाजी मंडईमध्ये 108 गाळेधारक आहेत. परिसरात सर्वात मोठी उलाढाल असलेली भाजी मंडई म्हणून मंडईचा लौकीक आहे. मात्र, काही दिवासांपासून या भाजीमंडईला समस्यांचे ग्रहण लागले आहे. अतिक्रमणाबरोबरच भाजी मंडई परिसरात असलेली असुविधा आणि अस्वच्छता यामुळे विक्रेत्यांबरोबरच भाजी खरेदी करणाऱ्या नागरिकांनाही दुर्गंधीचा समाना करवा लागत आहे.

मंडईच्या प्रवेशद्वारावर झालेल्या अतिक्रमणामुळे मंडईत प्रवेश करताना कसरत करावी लागते. शिवाय मंडईमधील विक्रेत्यांच्या व्यावसायवरही परिणाम होऊ लागला होता. मध्यंतरी ही अतिक्रमणे हाटवण्याच्या मागणीसाठी मंडईमधील गाळेधारकांनी मोर्चा काढून आंदोलन केले होते. मात्र, त्यानंतरही अतिक्रमणावर काहीच कारवाई न झाल्यामुळे संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी महापालिकेसमोर भाजीपाला फेकला होता. तरीही राजकीय आश्रयामुळे या अतिक्रमणांवर कारवाई होत नाही. त्यामुळे आजही भाजीमंडईच्या प्रवेशद्वाराला असलेला अतिक्रमणाचा विळखा कायम आहे.

भाजी मंडईमध्ये मुलभूत सुविधा देण्यातही महापालिका उदासीन आहे. सध्या भाजी मंडईच्या शेजारीच अस्वच्छतेच साम्राज्य पसरले आहे. भाजी विक्रेत्यांनी खराब झालेला भाजीपाला मंडईच्या शेजारीच फेकून दिलेला असल्याने हा भाजीपाला सडून दुर्गंधी पसरत आहे. मंडई परिसराच्या स्वच्छतेसाठी उपाययोजना केली जात नाही.

महापालिकेने केली दिशाभूल…
भाजी मंडईमधील गाळेधारकांनी आंदोलन केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी अतिक्रमणावर दोन दिवसांत कारवाई करु, असे लेखी अश्‍वासन दिले होते. मात्र, त्यानंतर कसलीच कारवाई करण्यात आली नाही, गाळेधारकांच्या समाधानासाठी मंडईच्या सीमा परिसरात पांढरी पट्टी मारुन सीमा निश्‍चित केली आहे. मात्र, त्यापुढे कोणतीही कारवाई झालेली नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले.

मंडईच्या प्रवेशद्वारावर असलेली अतिक्रमणे हाटण्यसाठी मंडईमधील 108 गाळेधारकांनी मोर्चा तसेच महापालिकेसमारे भाजी फेकून आंदोलन केले. आयुक्‍तांनी अतिक्रमणे हाटवण्याचे लेखी अश्‍वासन देवूनही कसलीही कारवाई केलेली नाही. आता हा प्रश्‍न मार्गी लागला नाही, तर पुढील काही दिवसांत गाळेधारकांकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
– निखील बनसोडे, गाळेधारक, भाजी मंडई.

 

Leave A Reply

Your email address will not be published.