बीड:शहरातील मल्टीपर्पज क्रीडांगण येथे भुयारी गटार योजना, निवारा गृह,नगरोत्थान अंतर्गत सिमेंट रस्ते, प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत ४४८ घरांची निर्मिती आणि सभागृह नामकरण अशा पाच विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. दरम्यान पंकजा मुंडे बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड शहराच्या विकासासाठी ४९५ कोटी रुपयांचा भरीव निधी दिला. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार पारदर्शकतेने जनतेपर्यंत विकास घेऊन जात आहे. त्याचबरोबर जिल्हा वासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या रेल्वेचा प्रकल्प मंजूर करून यासाठी दोन हजार ८०० कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. बीडच्या विकासाला या शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात ९५० किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होत आहेत.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात एक हजार १०० किलोमीटरचे रस्ते होत आहेत. रस्त्यांच्या विकासातून जिल्हा समृद्धीकडे वाटचाल करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार १०० कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे. तसेच खरीपातील नुकसानभरपाई म्हणून शासनाने ६१६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी १२६ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. बीड जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून येथील महिलांनीही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. महिला बचतगटांनी सुमतीबाई सुकळीकर योजनेचा लाभ घेऊन प्रगती करावी, असे आवाहनही मुंडे यांनी केले.
याप्रसंगी आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस यांचीही भाषणे झाली. शासन विकासाला प्राधान्य देत आहे. बीड जिल्हा दुष्काळी जिल्हा असल्याने येथील शेतकऱ्यांना गहू आणि तांदूळ यांच्या वितरणात वाढ करावी, अशी मागणी केली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा