भाजप सरकारमुळे शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ

हर्षवर्धन पाटील यांचा घणाघाती आरोप : निरवांगीत उन्हाळी आवर्तनाबाबत बैठक

निमसाखर- आपल्या काळात उन्हाळ्यात मुबलक पाण्यामुळे शेतात बेडके ओरडत होती, अशी अवस्था होती. मात्र, सध्या हक्‍काचे पाणी असून देखील पाणी मिळत नाही. नियोजनशून्य कामामुळे शेतकऱ्यांवर भिक मागायची वेळ सरकारने आणली आहे. जर वाढप्या जर ओळखीचा असेल तर जेवण भरपूर मिळते, अशी अवस्था तालुक्‍याची झाली आहे, असा टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हाणला. 22 गावांमधील पाणीप्रश्‍न गंभीर झाला आहे. धरणात पाणी असताना जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे नियोजन चुकले असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला.

निरवांगी (ता. इंदापूर) येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील भागात शेतकऱ्यांच्या उन्हाळी आवर्तनासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ठोस आश्‍वासन मिळाले नसल्यामुळे शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले आहेत. यावेळी ऍड. कृष्णाजी यादव, मयूर पाटील, कांतीलाल झगडे, विकास पाटील, अजिनाथ पाटील, दशरथ पोळ, महावीर गांधी, सुभाष पोळ, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण सुदरीक, फौजदार जगताप, पोलीस कर्मचारी एम. जी. फाळके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, जलसंपदा खात्याची पाणीपट्टी या भागातील शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे भरलेले आहे. तरीही निरवांगी, निमसाखर, घोरपडवाडीसह अन्य भागात पाणी मिळत नसेल तर तालुक्‍यातील नियोजन कमी पडत आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाई भीषण होत आहे. जलसंपदा खात्याचे पाणी न मिळाल्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास मदत मिळणार आहे. सध्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. यासंदर्भात तालुक्‍यात गेली सहा महिन्यांपासून विषय होत आहे. परंतु अद्यापही चाराही नाही. तसेच डेपोचा पत्ता नाही, अशी अवस्था तालुक्‍यात झाली आहे. इंदापूर तालुक्‍यात आत्महत्या घडत आहेत. ही गंभीर बाब असून संकटात आम्ही तुमच्याबरोबर आहे. सध्या पदावर नसलो तरी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तसेच सहकार्य करण्यास तत्पर राहणार आहे, असा विश्‍वास शेतकऱ्यांना दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.