भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाचा भाकपच्या वतीने निषेध

नगर -केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदविण्यात आला. सोमवारपासून सुरु झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्‍नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात ऍड.कॉ. सुभाष लांडे, ऍड.कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. भैरवनाथ वाकळे, अंबादास दौंड, तुषार सोनवणे, दीपक शिरसाठ आदी सहभागी झाले होते.

मोदी सरकारने करोना महामारीच्या संकट काळाचा गैरफायदा घेत देशातील श्रीमंत भांडवलदारांच्या बाजूने निर्णय घेऊन व सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून अभूतपूर्व संकटात ढकलेले आहे. टाळेबंदीच्या काळात कोट्यावधी लोकांनी रोजगार गमावला आहे. चुकीच्या पद्धतीने व कोणतीही पूर्वनियोजन न करता करण्यात आलेले टाळेबंदी हे स्थलांतरित मजुरांसाठी, असंघटित कामगारांसाठी मरण आणि यातनांचे प्रवेशद्वार ठरले.

बेरोजगारीने पन्नास वर्षाचा उच्चांक मोडला आहे. तर सर्वसामान्य नागरिक मंदीच्या खाईत लोटला गेला आहे. 44 कामगार कायदे मोडीत काढून चार कोड मध्ये रुपांतरीत करून कामगारांचे हक्क हिरावून घेतले जात असल्याचा आरोप भाकपच्या वतीने करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.