भाजप सरकारचा मतदारांनी कडेलोट करावा – वळसे पाटील

पारगाव शिंगवे – लोकसभा 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी मोठमोठी खोटी आश्‍वासने देऊन भानामती केली. आता, या निवडणुकीत त्या प्रश्‍नांवर हे सरकार बोलायला तयार नाही. आता, मतदारांनी या सरकारचा कडेलोट करावा. शरद पवार यांची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना मतदान करावे, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.

वळती (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आय, मित्र पक्षांचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी वळसे पाटील बोलत होते. यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, सभापती उषा कानडे, शिरुर लोकसभा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन भोर, जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रमेश खिलारी, उद्योजक किसन उंडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर, उत्तम थोरात, शरद शिंदे, निलेश थोरात, वैभव उंडे, संदीप थोरात, आशा शेंगाळे, सरपंच अनिता भोर, डॉ. अशोक भोर, धोंडीभाऊ भोर, बाळासाहेब बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले की, मोदींनी गेल्या निवडणुकीत अच्छे दिन, कर्जमाफी, शेतमालाला दिडपट भाव, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात टाकणार, परदेशातून काळा पैसा आणणार अशी मोठ-मोठी आश्‍वासने देऊन निवडणूक जिंकली होती. त्यापैकी किती आश्‍वासने पूर्ण झाली हे आपणास माहीत आहे. आता, पुन्हा निवडणूक लागली आहे. त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम म्हणाले की, सध्याचे भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. आढळरावांनी भाजप सरकारच्या विरोधात अनेक वल्गना केल्या. परंतु,आता युती झाल्यावर तेच आढळराव मोदींच्या नावावर मते मागत आहेत. यावेळी शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, संदीप थोरात, ऋषिकेश शेळके, बाळासाहेब बोऱ्हाडे, शब्दाली वाळुंज, शिवाजी लोखंडे यांची मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अर्जुन भोर यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.