भाजप विरोधात मतदान केल्यास ते मोदींना समजेल ! – भाजप आमदाराची मतदारांना धमकी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदार केंद्रावर टीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यात त्यांना तुम्ही कोणाला मतदान करीत आहात हे समजणार आहे हे लक्षात घेऊन केवळ भाजपलाच मतदान करा असा धमकीवजा इशारा गुजरात मधील एका भाजप आमदाराने दिला आहे. एका प्रचार बैठकीत बोलताना त्यांनी हा इशारा दिल्याची क्‍लीप सर्वत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

हा धमकीवजा इशारा देणाऱ्या भाजप आमदाराचे नाव रमेश कटारा असे असून ते गुजरातमधील फतेपुराचे आमदार आहेत. दाहोद मतदार संघातील एका गावातल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी ही धमकी दिली असून ती कॅमेऱ्यात नोंदवली गेली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की जेव्हा तुम्ही मतदानाला जाल तेव्हा मतदान यंत्रावर तुम्हाला भाजपचे उमेदवार जसंवतसिंह भाभोर यांचे नाव आणि छायाचित्र दिसेल. त्याच्या पुढे तुम्हाला कमळाची निशाणी दिसेल. तुम्ही तेच बटन दाबायचे आहे. त्यात कोणतीही चूक होता कामा नये. यावेळी मोदी साहेबांनी मतदान केंद्रावरच कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे तुम्ही कॉंग्रेसला मतदान केले की भाजपला हे लगेच समजेल. तुमच्याकडील आधार कार्डावरून तुमचा फोटो लगेच ओळखला जाईल आणि तुम्ही पकडले जाल. तुम्ही भाजप विरोधात मतदान केले तर तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत असे ते यावेळी म्हणाल्याचे व्हीडीओ रेकॉर्डिंग मध्ये दिसते आहे.

या प्रकाराच्या विरोधात आता राजकीय प्रतिक्रीयाही यायला लागल्या आहेत. राजद पक्षाने त्यावर तीव्र आक्षेप घेत म्हटले आहे की अशा धमक्‍या गांभीर्याने घ्याव्या लागतील.पक्षाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी या प्रकारावर आपल्या ट्‌विटर अकौंटवर प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की गरीब, असाहय मतदारांना धमकावण्याचा हा प्रकार असून त्याचे तीव्र पडसाद उमटतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.