भाजपमध्ये नाराजीचा भडका

निष्ठावंतांचे उपोषण : स्वीकृत सदस्य निवडीत डावलल्याचा आरोप

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील निष्ठावान आणि आयाराम यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. महापालिकेच्या प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यांच्या निवडीत डावलल्याचा आरोप करत झालेल्या अन्यायाविरोधात जुन्या कार्यकर्त्यांनी पिंपरीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आंदोलन स्थळी लावलेल्या फलकावर “जुने कार्यकर्ते सर्वच निराधार, शहरातील पार्टीला नाही कुणाचाच आधार’ असा मजकूर लिहत आपली नाराजी व्यक्त केली आहे. अशाप्रकारे “पार्टी विथ डिफरन्स’ असलेल्या भाजपमधील मतभेदामुळे विरोधकांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या 121 उमेदवारांपकी 24 जणांची वर्णी लागली आहे. या पदावर नेमकी कोणाला संधी द्यायची यावरुन सत्ताधारी भाजपमध्ये बुधवारी (दि.25) रात्री उशिरापर्यंत धुसफूस सुरु होती. अनेक बैठका होऊनही आमदार लक्षमण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यासह आझम पानसरे यांनी मात्र आपल्या समर्थकांची या पदांवर वर्णी लावण्यात यश मिळाले. याची कुणकुण लागताच भाजप निष्ठावंतांनी पिंपरी चौकात मंडप उभारून गुरुवारी सकाळपासूनच आमरण उपोषणाला सुरुवात केली. यामध्ये शेखर लांडगे, बाळासाहेब मोळक, अजय पाताडे, संतोष तापकीर, दिलीप गोसावी, पोपट हजारे, संजय बढे, राजु वायसे, दत्तात्रय तापकीर, बालाजी कानवटे आणि नामदेव पवार यांचा समावेश आहे.

याबाबत शेखर लांडगे म्हणाले की, पक्षाच्या पडत्या काळात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडली नाही. त्यावेळी विरोध करणाऱ्या व्यक्तिंच्या जाती आता पक्षाची धुरा गेली आहे. मात्र, याच व्यक्तिंकडून भाजपतील निष्ठावंतांना डावलून आपल्या मर्जीतील व्यक्तिंना पदे दिली जात आहेत. हा आमच्यावर अन्याय आहे. याविरोधात अन्याय असल्यानेच आम्हाला ही भुमिका घ्यावी लागली आहे.

बाळासाहेब मोळक यांनी देखील आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या. चऱ्होली भागात भाजप पॅनलमधील महिला उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या महिलेला स्वीकृत सदस्यपदाची बक्षिसी देण्यात आली आहे. हा कुठला न्याय आहे. स्वीकृत पदासाठी पक्षकार्याऐवजी व्यक्तिनिष्ठा हा निकष लावल्यानेच निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे. याचा आम्ही उपोषणाच्या माध्यमातून निषेध करत आहोत.

उपोषणकर्ते निर्णयावर ठाम
भाजपचे शहर सरचिटणीस प्रमोद निसळ यांनी दुपारी उपोषणकर्त्यांची भेट घेत, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे उपोषणकर्ते आपल्या निर्णयावर ठाम होते. सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळावी, याकरिता स्वीकृत सदस्यपदासाठी दोन वर्षांचा कालावधी ठरविण्यात आला असून, पुढील वेळी निष्ठावंतांना ही पदे कशी मिळतील, यादृष्टीने आपण प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. भाजपच्या नावाखाली एका वजनदार व्यक्तिने चऱ्होलीमध्ये दहा एकर जागा लाटली आहे. त्याचे पुरावे सादर करण्याचा मनोदय व्यक्त कला. तसेच हा पक्ष लोकशाही मार्गाने चालणार असून, पक्षातील आयारामांची “दादा’गिरी चालू देणार नसल्याचे सुनावले. सायंकाळी उशिरार्यंत या उपोषणकर्त्यांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या पदरी निराशा आली.

सत्ताधारी आंदोलकांच्या भुमिकेत
राष्ट्रवादीची एकहाती सत्तेच्या चाव्या आपल्याकडे हिसकावून घेत भाजपने मिळविलेल्या यशानंतर काही दिवसांतच पदाधिकारी निवडीवरुन कुरबुरी सुरु झाल्या आहेत. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीवरुन हे चित्र स्पष्ट झाले. आता प्रभाग स्वीकृत सदस्यपदाकरिता निष्ठावतांना डावलल्याने सत्ताधारी भाजपविरोधात भाजपचेच पदाधकारी उपोषण करत असल्याचे परस्परविरोधी दृश्‍य पहायला मिळाले. विरोधक मात्र सत्तासुंदरीमुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेला संघर्ष पाहत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)