भाजपमध्ये तिकीटासाठी चढाओढ?

  • सुनील शेळके यांनी शड्डू ठोकले : “शिंदेशाही बाणा’तून साधला नेम

– रोहिदास होले
गेली पंचवीस वर्षे “कमळ’ फुललेल्या मावळात विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये “लक्ष्य 2019′ करिता तिकीटासाठी चढाओढ निर्माण झालेली दिसते. आजपर्यंत मावळ तालुक्‍यात सलग तीनदा भाजपकडून कुणालाच “आमदारकी’च्या तिकीटाची “लॉटरी’ लागलेली नाही. आता हाच धागा पकडून तळेगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. पण तरीही यदाकदाचित आमदार बाळा भेगडे यांना पक्षाकडून “चाल’ मिळालीच तर शेळके अण्णा ऐनवेळी कोणते “शिवधनुष्य’ उचलणार? याबाबत राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार असताना मावळ खोऱ्यात भाजपची चांगलीच “हवा’ होती. गेल्या काही काळात मावळात पुढचा आमदार शिवसेनेचा हवा’, अशी गर्जना करीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत कार्यकर्त्यांना “टॉनिक’ देवून गेले. आजपर्यंतचे हेवेदावे बाजूला ठेवून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठेने काम करा, पक्षाकडून तुमचा निश्‍चित विचार केला जाईल, असे सांगत खासदार राऊत यांनी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेचे रणशिंग फुंकले. भाजपकडे आमदार बाळा भेगडे यांनी दोन “टर्म’ यशस्वी कारकिर्द सुरू आहे. मात्र आता आमदारांविरोधातच भाजपमधूनच “फिल्डिंग’ लावलेली दिसते. तळेगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांची तिकीटासाठी सुरू असलेली धडपड लपून राहिलेली नाही. सामुदायिक विवाह सोहळे, आरोग्य शिबीर, गर्दी खेचणारे सांस्कृतिक कार्यक्रम सारे काही सांगून जातात.

दुसरीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विचार केला, तर विधानसभेचा उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, असे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनीही भेटीगाठी वाढविलेल्या दिसतात. पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे हे देखील तिकीटाच्या शर्यतीत अग्रभागी आहेत. राज्यभर सुरू असलेल्या “हल्लाबोल’ने राष्ट्रवादीच्या गोटात कमालीची “जान’ आणली. मावळातील मोठी राजकीय घडामोड पाहिली तर मागील आठवड्यात राष्ट्रवादीची साथ सोडून ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे कॉंग्रेसवासी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी कमजोर झाली असे बोलणे खोटे आहे, उलट राष्ट्रवादी निवडणुकीत जोरदार मुसंडी घेईल, असा विश्‍वास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आहे. माऊली दाभाडे यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला फायदा होईल की तोटा हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय नेतेमंडळी आपल्या समर्थकांसह “पळापळ’ करतात. ही नेहमीचीच आवक-जावक आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. राजकीय मंडळी मागील काही काळात मावळ तालुक्‍यातील राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कडवे आव्हान निर्माण करतील, असे भाकीत वर्तविले जात आहे. त्यातच सुनील शेळके यांनी विधानसभेची तयारी सुरु केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

पुणे जिल्ह्याची राजकीय मांडणी करताना भाजपची “सुभेदारी’ म्हणून मावळकडे पाहिले जाते. रुपलेखा ढोरे, दिगंबर भेगडे आणि बाळा भेगडे यांनी केंद्रात आणि राज्यात आघाडीचे सरकार असतानाही मावळच्या खोऱ्यात भाजपने कमळ फुलवले. पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसल्यामुळे राष्ट्रवादीला नेहमीच दुसऱ्या रांगेत बसली. परिणामी मावळात नेहमी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असा कडवा संघर्ष पाहावयास मिळाला. पूर्वी आघाडी आणि युती सत्तेच्या लाथाळ्यात मावळ तालुक्‍यात कॉंग्रेस व आता शिवसेनेची अवस्था बिकट झाली. संपूर्ण तालुक्‍याच्या राजकीय सारिपाटात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोनच पक्ष “ऍक्‍टिव्ह’ राहिल्याचे पहायला मिळाले. परंतु, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये “टॉनिक’ भरले. कारण मावळ लोकसभा मतदारसंघात सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना “मावळ’ गड राखण्याचे दिव्य पार करावे लागणार आहे.

मावळ विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात “हॅट्रीक’साठी आजपर्यंत न दिलेली संधी ही सुनील अण्णांसाठी जमेची बाजू आहे. तसेच गेल्या काही काळात लोकोपयोगी कामे, गरिबांना मदत, पदरमोड करून सुरू असलेली कामे, सण, उत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रम, वाढता जनसंपर्क या सगळ्या घडामोडी पाहता सुनील शेळके विधानसभेकरिता प्रबळ इच्छुकांच्या रांगेत बसले आहेत.

भाजपसाठी धोक्‍याची घंटा…
नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या, पुणे आणि मुंबई शहरांच्या मध्यभागी असलेला मावळ तालुका. त्यात लोणावळ्यासारखी पर्यटननगरी असताना मागील साडेतीन वर्षांत कोणत्याही प्रमुख कामांचा सुरूवात झालेली दिसत नाही. विशेष म्हणजे प्रलंबित कोणत्याही प्रश्‍नांना हात घातलेला नाही. त्यामुळे आपसूक भाजप विरोधी पक्षांबद्दल सहानभूती वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याशिवाय भाजपवर 25 वर्षे विश्‍वास दाखवला, त्या तुलनेत अपेक्षित विकास झालेला नाही, असाही प्रचार आणि प्रसार विरोधकांकडून केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)