भाजपने मतदारसंघ आपल्याला का सोडायचा ? 

 

उध्दव ठकरेंच्या प्रश्‍नांने विधानसभेचे इच्छूक गारद


 

पुणे : “विधानसभा निवडणूक लढविण्यास तुम्ही इच्छूक आहात, पण पुण्यात ज्या विधानसभेच्या ठिकाणी भाजपचा विद्यमान आमदार आहे. तो मतदारसंघ भाजपने आपल्याला का सोडायचा ? असा थेट सवाल शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील विधानसभा प्रमुखांना केला.

त्यामुळे या प्रश्‍नाने शिवसेनेचे विधानसभेसाठीचे इच्छूक ठाकरे यांच्या एकाच प्रश्‍नाने गारद झाले असून पुण्यात आपल्याला युतीचेच काम करावे लागणार असल्याची पक्की धारणा त्यांनी करून घेतली आहे. शहरात केलेल्या संघटनात्मक बदलानंतर मागील आठवडयात ठाकरे यांनी शहरातील संघटनात्मक बांधणीसाठी नेमलेल्या आठ विधानसभा प्रमुखांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी ठाकरे यांनी या सर्वांशी वैयक्तिक चर्चा केली. त्यात, या आठही मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतला.
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेकडून मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. त्यात शहर प्रमुखाची दोन्ही पदे पक्षाने स्थगित केली असून पक्ष संघटनेची जबाबदारी सांभळण्याची जबाबदारी आठ विधानसभा प्रमुखांवर देण्यात आली आहे. त्यातील काही विधानसभा प्रमुख अगामी विधानसभेसाठी दावेदार समजले जात होते. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजप विधानसभेच्या निवडणूका स्वतंत्र लढली होती तर त्यानंतर लोकसभा निवडणूकी पूर्वी पर्यंतही दोन्ही पक्षात युती होण्याची चिन्हे नव्हती. त्यामुळे गेल्या चार वर्षात शहरात अनेकांनी विधानसभेची पायरी चढण्याची तयारी केली होती. मात्र, लोकसभेसाठी आघाडी झाल्यानंतर या शिवसेनेच्या इच्छूकांच्या आशा धुसर झाल्या होत्या. मात्र, पुण्यात पक्ष संघटना टिकविण्यासाठी काहीतरी जागा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आता थेट ठाकरे यांनीच या विधानसभा प्रमुखांची विकेट काढल्याने, अनेकांना आपल्या विधानसभा वारीला मुरड घालावी लागणार आहे.

          पक्ष प्रमुख ठाकरे यांनी प्रत्येक विधानसभा प्रमुखाला स्वतंत्र भेट दिली. ही भेट या प्रमुखांसाठी थोडी खुशी थोडी गम ठरली आहे. या बैठकीत ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना इच्छूक आहात का आणि हा मतदार संघ भाजपने आपल्याला का सोडायचा असा थेट प्रश्‍न केला. त्यावर कोणत्याही पदाधिकाऱ्याला उत्तर देता आले नसल्याचे सांगण्यात आले. या वेळी ठाकरे यांनी पक्ष संघटने सोबतच, भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारसाठी कशा प्रकारे काम करणार, पक्ष संघटन कशा प्रकारे वाढविणार असे प्रश्‍नही उपस्थित करण्यात आले. 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)