भाजपने भ्रष्टाचारात राष्ट्रवादीला पछाडले !

पिंपरी – शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी पिंपरी चिंचवड पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपने राष्ट्रवादीलाही मागे टाकले असून, दुपटीने भ्रष्टाचार चालवला असल्याचा आरोप केला. तर खासदार आढळराव पाटील यांनी नाशिक फाटा ते खेड सहा पदरी रस्त्याच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप केला. यावेळी दोन्ही खासदारांनी नामोल्लेख टाळत दोन्ही आमदारांवर न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचाही आरोप केला.

यावेळी बारणे म्हणाले की, आमचा विरोधाला विरोध नाही. केवळ आरसा दाखवून मागे काही तरी वेगळेच करायचे याला आमचा विरोध आहे. ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेऊन निविदा काढल्या जातात. सत्ताधा-यांकडून केवळ करदात्यांच्या पैशांची लूट सुरु आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला वैतागून जनतेने भाजपला सत्ता दिली. परंतु, भाजपने वर्षभरात राष्ट्रवादीला मागे टाकत भ्रष्टाचार सुरु केला आहे. राष्ट्रवादीने इतक्‍या वर्षात जेवढा भ्रष्टाचार केला नाही, तेवढा वर्षभरात भाजपने केला आहे.

यावेळी दोन्ही खासदारांनी दोन्ही आमदारांवर न केलेल्या कामचे श्रेय लाटण्याचा आरोप ही केला. खासदार आढळराव म्हणाले की, नाशिक फाटा ते खेड सहा पदरी रस्त्यासाठी आपण 2007 पासून प्रयत्न करत आहोत. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेने या कामात देखील अडथळा निर्माण केला. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालिकेने नेशनल हायवे ऑथिरिटीस पत्र लिहिले की, आमच्या जागेत अशा प्रकारे काम करु नये, तिथे आम्हाला बरेच प्रकल्प राबवायचे आहेत. त्यामुळे टेंडर रद्द करण्यात यावे, अशी मागणी पालिकेतर्फे करण्यात आल्याचे आढळराव यांनी सांगितले.

खासदार बारणे म्हणाले की, बोपखेलच्या पुल प्रकरणात देखील श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत आहे. या संदर्भात संरक्षण मंत्री, संरक्षण विभागाचे अधिकारी, कलेक्‍टर यांच्यासोबत सात वेळा बैठक आयोजित केली. या बैठकींमध्ये केवळ आमदार ऍड. चाबुकस्वारच उपस्थित होते, इतर कुणीही नाही. तरी देखील श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे.

खासदार बारणे म्हणाले पिंपरी चिंचवडमधील नद्यांची अवस्था सुधारण्यासाठी आपण केंद्रीय मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा करत होतो. परंतु नदी सुधार प्रकल्पात देखील पिंपरी चिंचवडला डावलून पुण्याला 850 कोटी रुपये देण्यात आले. त्याच नदी सुधार प्रकल्पासाठी पालिकेने सल्लागार नेमून उधळपट्टी सुरु केली आहे. याबाबत संबंधित मंत्रालयाकडे चौकशी केली असता, अद्याप मंत्रालयाकडेच निधी नाही. यासाठी किमान तीन ते चार वर्षे वाट पहावी लागेल.

उल्लखेनीय बाब अशी की, सध्या पिंपरी चिंचवड शहरात नद्यांची अवस्था अत्यंत बिकट असून, नदी सुधार होणे आवश्‍यक आहे. दुसरीकडे खासदार बारणे यांना मंत्रालयाने सांगितले आहे की, निधी येऊन काम सुरु होण्यास तीन ते चार वर्षे लागतील. तोपर्यंत नद्यांची अवस्था आणखीनच बिकट होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)