भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी आता रस्त्यावर

संदीप वर्पे यांची माहिती; सरकारविरोधात जनमताचा रेटा वाढला
प्रभात वृत्तसेवा
नगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आता जनतेत नाराजी निर्माण व्हायला लागली आहे. दिलेली कोणतीही आश्‍वासने या सरकारांना पूर्ण करता आली नाहीत. देशभरात झालेल्या निवडणुकांत भाजपची पिछेहाट झाली आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहेत. अशा या फसव्या सरकारविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आता रस्त्यावर उतरणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिली.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जळगाव लोकसभा निवडणुकीचे प्रभारी, सोलापूरचे निवडणूक निरीक्षक, सोशल मीडिया कक्षाचे प्रमुख आणि आता नगर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वर्पे यांनी सांभाळल्या आहेत. त्यांनी “प्रभात’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. प्रभातच्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसची आगामी निवडणुकीतील भूमिका, संघटन, रणनीती आणि पुढची वाटचाल या विषयांवर त्यांनी मनमोकळी चर्चा केली.
यापूर्वीच्या निवडणुका लढविण्याची पद्धती आणि आता येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा असलेला भर यातील फरक सांगून वर्पे म्हणाले, की आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस सूक्ष्म नियोजन करणार आहे. जनतेच्या मनात सरकारविषयी असलेल्या रागाचे मतांत रुपांतर करण्यावर भर दिला जाणार आहे. भाजपच्या सत्तेच्या काळात दोन्ही कॉंग्रेसचे कार्यकर्ते देशोधडीला लागले. सहकारी संस्था मोडकळीस आणल्या. जनतेला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. आता कार्यकर्त्यांचाच नेत्यांवर दबाव वाढायला लागला आहे. त्यामुळे आता गटबाजी दिसत असली, तरी निवडणुकीच्या काळात ती दिसणार नाही. काम करणाऱ्यांना प्राधान्य हीच भूमिका असणार आहे. बुथ समित्याच्या नियुक्‍त्या आणि त्याचे “डिजिटालायझेशन’ करणार आहे. “सोशल मीडिया’ च्या माध्यमातून आता भाजपच्या टीकेला उत्तर देण्यास कार्यकर्ते तयार झाले आहेत. राहुल गांधी यांच्यावरच्या टीकेला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्तर देत आहेत, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसवरील टीकेला आता कॉंग्रेसचे कार्यकर्ते उत्तर द्यायला लागले आहेत. एवढे सामंजस्य दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत आले आहेत.
भाजपने मागच्या निवडणुकीत “सोशल मीडिया’ चा प्रभावी वापर केला. त्यात चुकीचा प्रचार केला;परंतु आता “सोशल मीडिया’ चे बुमरॅंग भाजपवर उलटले आहे, असे निदर्शनास आणून वर्पे म्हणाले, “”मोदींच्या चुकीच्या घोषणा, भाषणांना आता ट्रोल केले जात आहे. विशेषतः युवकांनी भाजपला भरभरून मते दिली; परंतु तोच वर्ग आता मोदींवर नाराज झाला आहे. त्याच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार सरकारने केला. मुद्रा योजनेतून मिळणाऱ्या कर्जातून कोणत्याही व्यवसायाला भांडवल पुरत नाही. त्यामुळे या योजनेचा तसा फार फायदा झाला नाही. रोजगारवृद्धी तर झाली नाहीच; उलट बेरोजगारी वाढली. नोटाबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले. ईपीएफ खात्यातील वाढ हा रोजगारवृद्धीचा निकष होऊ शकत नाही. त्यामुळे तर पंतप्रधानांपासून पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यापर्यंतच्या नेत्यांना भजी तळण्याचा व्यवसाय हा ही रोजगारवृद्धीचा मार्ग आहे, असे सांगावे लागले. त्याची प्रतिक्रिया युवकांत उमटली. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याची भाषा करणाऱ्या सरकारला त्याच्या दहा टक्केही रोजगारनिर्मिती करता आली नाही. ज्या कारणांसाठी नोटाबंदी केली, त्यापैकी एकही उद्देश साध्य झाला नाही. काळ्या पैशाला आळा घालता आला नाही. कॅशलेस व्यवहारातून नागरिकांच्या खिशाला चाट लावली. दहशतवाद कायम आहे. प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्‍वासन हवेत विरले. हमीभाव जाहीर केला; परंतु त्यासाठी तरतूदच नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयात उत्पादनखर्चापेक्षा दीडपट हमीभाव देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सादर केले.”
भाजपच्या सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी लादली जात असल्याचा आरोप करताना त्यांनी काही उदाहरणे दिली. काय खायचे, काय घालायचे, कसे राहायचे आणि आता कोणती पिके घ्यायची, हे ही सरकार ठरवायला लागले आहे, असे सांगून वर्पे यांनी नवीन भूजल कायद्याच्या दुष्परिणामाबद्दलही भाष्य केले. देशात मोदीविरोधी वातावरण तयार झाले आहे. अखिलेश यादव, मायावती यांची दुश्‍मनी जगजाहीर होती. कॉंग्रेस आणि तृणमूलमध्ये पराकोटीचा वाद होता. ही सर्व परिस्थिती असताना आता हे सर्व नेते एकत्र यायला लागले आहेत. भाजपचा पराभव या एकमेव उद्देशाने विरोधक एकत्र आले, तर देशात मोदी यांना पराभूत करू शकता येते, याची खात्री आता वाटायला लागली आहे. “शायनिंग इंडिया’ च्या काळानंतर भाजपच्या सरकारचा पराभव झाला होता आणि आता “अच्छे दिना’ चे स्वप्न विरल्यानंतर मोदी यांच्याविरोधात सुप्त लाट आली आहे. त्यामुळे भाजपचा पराभव होऊ शकतो. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजराथ, उत्तर प्रदेश आदी राज्यांत भाजपच्या जागा कमी होतील. छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेश ही राज्ये भाजपच्या ताब्यातून कॉंग्रेसकडे येतील, असा दावा त्यांनी केला.

मोदींचा प्रवास हृदयापासून डोक्‍यापर्यंत

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशातील जनतेने मनापासून प्रेम केले. त्यांना आपल्या हृदयात स्थान दिले. गेल्या चार वर्षांतील मोदी यांच्या कारभारामुळे मात्र त्यांच्याविरोधात शेतकरी, युवक, व्यापारी आदी समाजघटक प्रचंड नाराज झाले आहेत. या सर्व समाजघटकांच्या डोक्‍यात मोदी गेले आहेत, असे वर्पे यांनी सांगितले.

नगरमध्ये भाजप-शिवसेनेला “क्‍लिन स्वीप’ करणार

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी मोदी लाटेतही विधानसभेत यशाचा जो फॉर्म्युला वापरला, तोच फॉर्म्युला नगर जिल्ह्यातही वापरला जाईल.
नगर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी होईल. कोपरगाव, राहुरी, नेवासे व अकोले या चारही जागा राष्ट्रवादीला नक्की मिळतील. दक्षिणेतही नगर, श्रीगोंदे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पारनेर, शेवगाव-पाथर्डी, जामखेड-कर्जत या जागा मिळविण्याची व्यूहनीती आखली जात आहे. कॉंग्रेसचे तीन आमदार आहेत. दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाली आहे. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेस लोकसभेच्या व विधानसभेच्या सर्व जागा मिळवून भाजप-शिवसेनेला “क्‍लिन स्वीप’ करतील, असा विश्‍वास वर्पे यांनी व्यक्त केला.

मद्याचे शुल्क महिलांवर कशासाठी?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव 142 डॉलर असताना पेट्रोल, डिझेलचे दर आताइतके कधीच नव्हते. पन्नास रुपयांच्यापुढे दर गेले, तर लगेच रामदेव बाबा, श्रीश्री रविशंकरन मोदी यांच्या सुरात सूर मिसळून डॉ. मनमोहन सिंग यांच्याविरोधात बोलत होते. त्यानंतर 34-35 डॉलरपर्यंत भाव येऊनही इंधनाचे दर कमी झाले नाहीत. आता 70-75 डॉलरच्या आसपास भाव असताना पेट्रोल 85 रुपयांच्या पुढे गेले आहे. दुष्काळाच्या काळात लावलेला दोन रुपये सेस अजूनही सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने रस्त्याच्या बाजूची मद्यालये बंद करण्याचा आदेश दिला होता. मद्यालये बंद होण्याच्या निर्णयामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मद्यावर दोन रुपये कर आकारला. लोकसंख्येत पन्नास टक्के असलेल्या महिलांचा मद्याशी काहीही संबंध नसताना त्यांना पेट्रोलवरचा कर कशासाठी असा सवाल करून मद्यालये सुरू झाली, तरी कर मात्र चालूच असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)